उन्हापासून पुणेकरांना किंचित दिलासा : पावसामुळे घटले तापमान | पुढारी

उन्हापासून पुणेकरांना किंचित दिलासा : पावसामुळे घटले तापमान

पुणे: पुढारी वृत्तसेवा : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाचा तापमानावर किंचित परिणाम दिसला. रविवारचे शहराचे कमाल तापमान 40 वरून 38 अंशांवर खाली आले होते. तर किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झालेली दिसली. रविवारी पावसाचा अंदाज असूनही त्याने विश्रांती घेतली. त्यामुळे दुपारी चांगलाच उकाडा जाणवला. शनिवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्व पेठा आणि उपनगरांत पावसाने दाणादाण उडवून दिली.

त्यामुळे शहराच्या वातावरणात एकदम बदल झाला. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काही काळ दिलासा मिळाला. शनिवारी सायंकाळ ते उत्तररात्रीपर्यंत हवेत गारवा निर्माण झाल्याने हायसे वाटत होते. रविवारी सकाळीदेखील वातावरणात गारवा होता. मात्र दुपारी 1 ते 4 पर्यंत पुन्हा उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. सकाळी शहरात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वाटत होती, मात्र पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे रविवारी दुपारनंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली.

किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट

पावसामुळे शहराच्या कमाल तापमानात अवघ्या दोन अंशांची घट झाली असली तरी किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाली आहे. शहराचे किमान तापमान शुक्रवारी रात्री 12 वाजता 28 ते 29 अंशांवर गेले होते. शनिवारी झालेल्या पावसाने किमान तापमान 20 ते 22 अंशांवर खाली आले. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यातून किंचितसा दिलासा नागरिकांना
मिळाला आहे.

हेही वाचा

Back to top button