पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानात हेराफेरी झाल्याच्या आरोप झाला होता. त्यामुळे ११ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूरमधील 11 निवडणूक केंद्रांवर आज (दि.२२) पुन्हा मतदान होत आहे.
गोळीबार, धमक्या, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमची तोडफोड आणि मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे आरोप जातीय संघर्षाने प्रभावित असलेल्या मणिपूरमधून नोंदवले गेले. मणिपूरच्या अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूर या दोन लोकसभा जागांसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आणि 72 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हेराफेरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या मणिपूर युनिटचे अध्यक्ष के. मेघचंद्र म्हणाले की, पक्षाने मणिपूरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 'इनर मणिपूर' मतदारसंघातील 36 आणि 'बाह्य मणिपूर' मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती.
मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानादरम्यान काँग्रेसने निवडणुकीत हेराफेरी आणि बूथ कॅप्चरिंगचा आरोप करत ४७ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती. तथापि, आक्षेपांचा विचार केल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी केवळ ११ केंद्रांवरच फेरमतदान जाहीर केले होते.
सोशल मीडियावर पुन्हा मतदानासंबंधीचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पूर्व इंफाळमधील मोइरांगकाम्पू साजेब येथील मतदान केंद्राचे दृश्य दिसत आहे. लोक पुन्हा मतदानासाठी येथे जमले. पूर्व इंफाळमधील खुराई भागातही फेरमतदान घेण्यात येत आहे. या काळात मतदान केंद्राबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मतदान केंद्रांवर खुरई मतदारसंघातील मोइरांगकांपू साझेब आणि थोंगम लीकाई, क्षेत्रीगावमधील चार, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजू येथील एक, उरीपोकमधील तीन आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथौजममधील एका मतदान केंद्राचा समावेश आहे.