पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरील देशांतर्गत विमानोड्डाणे आणि प्रवासीसंख्येत सध्या वाढ होत आहे. मार्च 2024 या एकाच महिन्यात 5 हजार 543 विमानांची उड्डाणे झाली आहेत. त्याद्वारे 8 लाख 12 हजार 255 प्रवाशांनी प्रवास केला. ही विमानोड्डाणे आणि प्रवासी संख्या गेल्या वर्षीच्या मार्च 2023 या महिन्याच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे. पुणे शहराचा दिवसेंदिवस विकास होत आहे. त्यादृष्टीने कामधंदा, व्यवसायासाठी अनेकांना विमानप्रवास करावा लागत आहे. यामुळे लोहगाव येथील विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
त्याचबरोबर पुण्यातून विमानाद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे विमानतळाला नवीन टर्मिनलची गरज निर्माण झाली आहे, हे लक्षात घेत दुप्पट प्रवाशांची वाहतूक होण्यासाठी जुन्या टर्मिनलशेजारीच नवीन टर्मिनलची उभारणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. मात्र, आता येथील धावपट्टी वाढविण्याची आवश्यकता आहे, हा प्रश्न देखील पुण्यातील प्रशासनाने सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पुणे विमानतळ अधिकार्यांसोबत यापूर्वी अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु, याबाबत ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. धावपट्टी वाढविण्यासंदर्भात निर्णय झाल्यास विमानोड्डाणांमध्ये आगामी काळात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी मार्च 2023 मध्ये 7 लाख 61 हजार 597 प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला होता. यंदाच्या मार्च 2024 मध्ये 8 लाख 12 हजार 255 प्रवाशांनी येथून प्रवास केला. यावरून गेल्या वर्षातील मार्च 2023 या महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्च 2024 या महिन्यात तब्बल 50 हजार 658 प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी मार्च 2023 मध्ये 5 हजार 395 विमानोड्डाणे झाली होती. यंदा मार्च 2024 मध्ये 5 हजार 543 विमानांची उड्डाणे झाली. यावरून गेल्या वर्षातील मार्च 2023 या महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्च 2024 या महिन्यात तब्बल 148 विमानांच्या उड्डाणांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा