टीईटीला आचारसंहितेचा अडथळा : आता ‘या’ महिन्यातच होणार परीक्षा | पुढारी

टीईटीला आचारसंहितेचा अडथळा : आता 'या' महिन्यातच होणार परीक्षा

गणेश खळदकर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येणार होती. परंतु, लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे परीक्षा परिषदेला निविदा प्रक्रिया राबविताच आली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाइन घेण्यात येत होती. गेल्या दोन वर्षात टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
तर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टीईटी परीक्षादेखील ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी संबंधित उमेदवार करत होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली होती. परंतु, टीईटी परीक्षा विविध माध्यमातून होत असल्यामुळे संबंधित भाषांमध्ये प्रश्नपत्रिका ऑनलाइन तयार करण्यासंदर्भात परीक्षा घेणार्‍या एजन्सीने नकार दिला, त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्याशिवाय परीक्षा परिषदेकडे पर्यायच राहिला नाही.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी नेमलेल्या एजन्सीने परीक्षा घेण्यास नकार दिलेला असतानाच ऑफलाइन परीक्षा घेणार्‍या एजन्सीची देखील मुदत संपली होती. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार होती. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया परीक्षा परिषदेने सुरू केली. परंतु, लगेच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवताच आली नाही.  आता निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय राज्य परीक्षा परिषदेकडे पर्यायच राहिला नाही.
राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन होते. परंतु, तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली. परंतु, त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता आली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आता निविदा प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे.
– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद

हेही वाचा

Back to top button