क्रौर्याची परिसीमा ! एक दिवस आधीच खणला होता भाग्यश्रीसाठी खड्डा आणि नंतर.. | पुढारी

क्रौर्याची परिसीमा ! एक दिवस आधीच खणला होता भाग्यश्रीसाठी खड्डा आणि नंतर..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आलेल्या तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी अहमदनगर तालुक्यातील कामरगावच्या परिसरात एक दिवस अगोदरच जमीनीत खड्डा खनून ठेवला होता. तरुणीचा खून केल्यानंतर तिघांनी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आणि त्यानंतर जमीनीत पुरला होता. त्यासाठी एका दुकानातून टिकाव, फावडे देखील खरेदी केले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान भाग्यश्रीचा खून करण्यासाठी आरोपींनी पुर्व तयारी केल्याचे दिसून येते.

भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय.22,रा.लिव्हींग प्रिसो हाऊस साकोरेगनर विमानगर, मुळ. मु.पो. हरंगुळ बुद्रुक,ता.जि.लातुर) असे तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी, विमानतळ पोलिसांनी शिवम माधव फुलवळे (वय.21,रा.ऑक्सी हेवन सोसायटी, वाघोली, मुळ. नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (वय.23,रा.मुंबई, मु. सकनुर, नांदेड), सागर रमेश जाधव (वय.23,रा.कासलेवाडी,ता.शिरोळा अनंतपाळ, जि.लातुर) या तिघांना अटक केली. शिवम हा या घटनेतील मुख्य सुत्रधार असून, तो भाग्यश्रीसोबत एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दोघेही चौथ्या वर्षात वेगवेगळ्या विभागात होते. शिवम यानेच सुरेश आणि सागर या आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन भाग्यश्रीचा काटा काढला. क्रौर्याची परिसीमा म्हणजे तिचा खून केल्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरला होता. त्यानंतर तिघे नांदेडला फरार झाले होते.

झूम कार..अपहरण अन् मृतदेहाची विल्हेवाट

भाग्यश्री सुडे मुळची लातुर जिल्ह्यातील हरंगुळ बुद्रुक गावची. वडील गावचे माजी सरपंच. घरची परिस्थिती सधन. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती. एका नामांकित कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेत होती. तर आरोपी शिवम हा मुळचा नांदेड जिलह्यातील मुखेड तालुक्यातील सकनुर येथील आहे. त्याचे वडील शिक्षक आहेत. तो देखील त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दोघामध्ये मैत्री होती. 30 मार्च रोजी शिवम याने भाग्यश्रीला बाहेर जेवणासाठी जायचे आहे म्हणून फोन केला. त्यावेळी भाग्यश्री फिनिक्स मॉलमध्ये होती. शिवम कार घेऊन तेथे आला.

भाग्यश्रीने त्याच्यावर विश्वास ठेवून गाडीत बसली. त्यावेळी तिने इतर दोघांबाबत विचारले. शिवम याने मित्र असल्याचे सांगितले. रात्री साडे आठ वाजता चौघे गाडीतून नगरच्या दिशेने निघाले. काही अंतर पुढे गेल्यानंतर सागर आणि शिवम या दोघांनी चिकट टेपने भाग्यश्रीचे हात-पाय बांधले. क्षणाचाही विलंब न करता, दोघांनी तिचा गळा आणि दोंड दाबून खून केला. 29 मार्च रोजी कामरगावच्या परिसरात खड्डा खनून ठेवला होता. रात्री दिड वाजताच्या सुमारास निर्जनस्थळी तिघांनी भाग्यश्रीचा मृतदेह पेट्रोल टाकून टाळला. अगोदरच गाडीत पेट्रोल घेतले होते. त्यानंतर त्या खड्ड्यात पुरून टाकला.

अगोदर खून अन् नंतर खंडणीची मागणी

भाग्यश्रीचे ज्या दिवशी अपहरण करण्यात आले, त्याच दिवशी तिचा खून आरोपींनी केला. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या मोबाईलवरून मेसेज करून 9 लाखांच्या खंडणीची मागणी केली.
भाग्यश्रीचा मोबाईल आरोपींकडे होता. आरोपी आईचा मॅसेज आल्यानंतर तिच्याशी बोलत होते. दोन दिवसांनी म्हणजे, 2 एप्रिल रोजी आरोपींनी तिच्या कुटूंबियांशी संपर्क साधत खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास तिचे तुकडे करू अशीही धमकी दिली. त्यानंतर कुटूंबाने पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दिली. विमानतळ पोलिसांसह गुन्हे शाखेकडून भाग्यश्रीचा शोध सुरू केला होता. तिचे लोकेशन वेगवेगळे होत होते, त्यानूसार पोलीस शोध घेत होते.

अन् तिने आईला वाढदिवसाला जात असल्याचे सांगितले

भाग्यश्रीने 30 मार्च रोजी आईला फोनकरून मी, मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले होते.

एकुलती एक भाग्यश्री..!

सुडे कुटूंबिय मुळचे लातुर जिल्ह्यातील आहे. वडिल लातूर जिल्ह्यातील मोठे शेतकरी आहेत. त्यांना भाग्यश्री व एक मुलगा आहे. भाग्यश्रीला मोठं शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न होते. भाग्यश्रीही हुशार होती. परंतु, मित्रावर अतिविश्वास तिच्या जिवावर बेतला अन् तिचा घात झाला.

असा झाला खूनाचा उलगडा

गुन्ह्यापासून वाचण्यासाठी शिवम याने पुर्ण खबरदारी घेतली होती. त्याने आपल्या दोन मित्राला पैशाचे प्रलोभन दाखवले. त्यातील एकाने शिवम याला विचारले देखील होते. हे गंभीर आहे म्हणून, त्यावेळी त्याने आपण भाग्यश्रीला घाबरवत आहोत असे सांगितले. एकदा का पैसे मिळाले की संपले असे तो सांगत होता. मात्र शिवमच्या सैतानी डोक्या वेगळाच गेम सुरू होता. झुम कार भाड्याने घेण्यापासून ते भाग्यश्रीचे अपहरण, खून, मृतदेहाची विल्हेवाट ते खंडणीची मागणी याबाबत खबरदारी घेतली. मात्र त्याने केलेली एक चुक पोलिसांच्या नजरेत आली अन् त्याच्या पापाचा घडा फुटला. खंडणीचे पैसे शिवम भाग्यश्रीच्या बँक खात्यावर मागत होता. त्यासाठी त्याने भाग्यश्रीच्या फोन पेचा अ‍ॅक्सेस आपल्याकडे घेतला. तो घेताना त्याने मोबाईल क्रमांक मात्र आपला दिला होता.

ही प्रक्रिया करत असताना, जनरेट झालेला पिन त्याच्या मोबाईलवर आला. त्याचवेळी पोलिसांना शिवम याचा संपर्क क्रमांक मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने तो मी नव्हेच अशी भुमिका घेतली. याचवेळी दुसर्‍या पथकाला सुरेश आणि सागर या दोघांची माहिती मिळाली. आता तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आपला पॅटर्न राबविला. त्याचवेळी आरोपींनी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले. रविवारी रात्री उशीरा भाग्यश्रीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून, ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालातच तिचा खून कशाप्रकारे केला हे स्पष्ट होईल.

विमानतळ पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. 9 लाखाच्या खंडणीसाठी भाग्यश्रीचे अपहरण केल्याचे आरोपी सांगत आहेत. मात्र त्यांनी भाग्यश्रीचा खून करून खंडणीची मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सर्जेराव कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन उपनिरीक्षक चेतन भोसले, अंमलदार, सचिन जाधव, गणेश इथापे, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश तोडेकर, अस्मल अत्तार, किरण खुडे, अंकुश जोगदंडे,योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, ज्ञानेश्वर आवारी,अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

 

Back to top button