मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातला वाद टोकाला गेला असून, याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेेने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला नाही, तर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी सोमवारी दिली. दरम्यान, या जागेवर 'मविआ'चा निर्णय उद्या (मंगळवार) अपेक्षित आहे.
सांगलीतील काँग्रेसचे नेते काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट बघत आहेत. शिवसेनेने उमेदवार मागे घेतला तर ठीक; अन्यथा विशाल पाटील स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस पक्षाची त्यासाठी मौन संमती असेल, असेही सांगितले जात आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. त्यापूर्वी आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात सांगली आणि भिवंडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आघाडीच्या नेत्यांतर्फे सांगण्यात आले.
ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची सांगलीतील उमेदवारी मागे घ्या, असा आग्रह काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. परंतु, अद्याप ठाकरे यांच्याकडून कोणताही शब्द काँग्रेसला मिळालेला नाही.
सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम केवळ राज्यातच नव्हे देशपातळीवरही होऊ शकतो, अशी भीती काँग्रेस श्रेष्ठींना वाटत आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्यात काँग्रेस कमी पडतेय, हे चित्र निर्माण होणे हे काँग्रेससाठी फायद्याचे नाही. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीसाठीही काँग्रेस श्रेष्ठी अनुकूल नाहीत. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांच्यासह त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणार नेत्यांना काँग्रेस सांगलीची जागा शिवसेनेसाठी सोडू शकते व या प्रकरणी तुटेल इतके ताणणार नाही, असे स्पष्ट संकेत काँग्रेस श्रेष्ठींतर्फे सांगलीतील काँग्रेस नेत्यांना देण्यात आले आहे. सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांबाबत काँग्रेस श्रेष्ठींचा अधिकृत निर्णय उद्या पत्रकार परिषदेपूर्वी कळविला जाणार आहे. मात्र सध्या प्राप्त झालेले संकेत पाहता काँग्रेस श्रेष्ठी शिवसेनेसोबतची मैत्री टिकविण्यासाठी, इच्छा नसतानाही सांगलीच्या जागेवर पाणी सोडण्याच्या मनःस्थितीत आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.
सांगलीबाबत काँग्रेस आग्रही : थोरात
महाविकास आघाडीत जागावाटपाचे सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ वगळले तर सर्व वाद शमले आहेत. पण सांगलीची जागा ही आमची आहे. त्यामुळे ती ठाकरे गटाला सोडू नये, अशी आक्रमक भूमिका सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी भेट घेतली आहे. त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांच्यात सांगलीवर सोमवारी चर्चा झाली. कदम यांनी आज याबाबत थोरात यांची भेट घेतली.
राज्यातील सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. आम्ही अजूनही सांगलीच्या जागेसाठी ठाम आणि आग्रही आहोत. हे आम्ही दिल्लीतील नेत्यांना कळविले आहे. आता आम्ही त्यांच्या निर्णयांची प्रतीक्षा करत आहोत. एका जागेच्या बदल्यात दुसरी जागा देणे यासंदर्भात हा विषय राहिलेला नाही. सर्व जागेच्या संदर्भात आता चर्चा जवळपास संपली असून केवळ काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
कदम, पाटील यांचा हट्ट; काँग्रेसला मात्र धास्ती
ठाकरे गटाने आपला उमेदवार निवडणूक मैदानात ठेवला, तरी आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या, असा हट्ट विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे धरला आहे; पण मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी दिली, तर इंडिया आघाडी एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणार नाही, अशी भीती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सांगली आणि भिवंडीवर मंगळवारी तोडगा निघेल, असे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले आहे.