अकोला: काकाच्या अंत्यसंस्काराला जाताना शिक्षकाचा अपघातात मृत्यू | पुढारी

अकोला: काकाच्या अंत्यसंस्काराला जाताना शिक्षकाचा अपघातात मृत्यू

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला येथून पारसकडे जात असलेल्या दुचाकीला भरधाव कारने गतिरोधकावर मागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना अकोल्याजवळ घडली. चुलत काकाचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे पारस येथील रहिवासी व सरस्वती विद्यालयात सहाय्यक शिक्षक असलेले प्रा. सुनील अंबादास लांडे (वय ५०) हे काही दिवसांपासून अकोला येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या चुलत काकाच्या अंत्यसंस्कारासाठी सुनील लांडे व त्यांच्या पत्नी दुचाकीवरून (एमएच ३० बीआर ५००४) अकोला येथून निघाले होते. सकाळी ८.३० च्या दरम्यान अकोला शहराजवळील गतिरोधकावर मागून येणाऱ्या कारने (एममच २७ एआर २८७२) दुचाकीला जोरदार धडक दिली.

यामध्ये सुनील लांडे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार कार चालकाविरूध्द जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button