तुम्ही अजून काय पाहिलंय..? गडी थांबणारा नाही; शरद पवारांचे विधान चर्चेत 

तुम्ही अजून काय पाहिलंय..? गडी थांबणारा नाही; शरद पवारांचे विधान चर्चेत 
बारामती : पुढारी वृत्तसेवा : वयावरून वेळोवेळी केल्या जाणार्या टिपण्णीवर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बारामती तालुक्याच्या दौर्यात उंडवडी येथे भाष्य केले. ते म्हणाले, अनेकजण माझे वय ८४ झाले ८५ झाले असे म्हणत आहेत. तुम्ही वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिलं आहे, हा गडी थांबणार नाही. ज्या लोकांनी साथ दिली त्या लोकांना वार्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहिल अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. बारामतीच्या दुष्काळी भागातील गावांना सोमवारी (दि. ८) शरद पवार यांनी भेट दिली. उंडवडी  कडेपठार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, विरोधक म्हणतात यांचे आता वय झाले, यांच्यावर आता काय अवलंबून राहायचं, पण माझे तुम्हाला सांगण आहे की माझे वय काढू नका. लोकांचे काम असेल, लोकांच्या हिताची जपणूक करणे हेच माझे काम आहे. मला बारामतीकरांनी काय दिलेले नाही असा सवाल करून पवार म्हणाले. याच लोकांनी मला सगळे दिले. आमदार मंत्री, चारदा मुख्यमंत्री केले. संरक्षण, शेती मंत्री, विधानसभा लोकसभा राज्यसभा सतत एक दिवसाची सुट्टी नाही. मी ५६ वर्षे कार्यरत राहिलो. शेतात काम करणार्या बैलांना सुद्धा शेतकरी सुट्टी देतात मला ५६ वर्षात एकदाही सुट्टी दिली नाही, हे वागणं बरं आहे का असा मिश्किल सवाल त्यांनी केला.

.. त्यांनी टोकाची भूमिका घेतली : अजित पवारांना टोला

ते पुढे म्हणाले, नवीन पिढी तयार करणे, त्यांच्यामार्फत विकासाचे काम करून घेणे हाच माझा स्वभाव आहे. गेल्या २० वर्षात मी स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, कारखाने यात कोणाला संधी द्यायची हे मी बघत नव्हतो. पण नव्या पिढीच्या हाती सूत्रे घ्या, त्यातून योग्य ते काम करा. अडचण आली तर माझ्याकडे या, हे मी सांगत होतो. पण काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली. ते भाजपबरोबर गेले. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करणारा पक्ष नाही. त्यांच्याबरोबर जाण्यासाठी लोकांनी मते दिली नव्हती. मागील विधानसभा निवडणूकीत तुम्ही मतदान हे राष्ट्रवादीच्या नावाने केले. आज ते हे विसरून भलतीकडे जात आहेत. माझ्या मते हा चुकीचा रस्ता आहे.
मी २० वर्षात स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहत होतो. परिणामी एमआयडीसीत २५ हजार लोकांना रोजगार मिळाला. उंडवडीसारख्या गावात उद्योजक तयार झाले. इथे मी पहिल्यांदा आलो तेव्हा ज्ञानोबा साळुंखेंच्या घरी पितळीतून चहा पिलो होतो. नंतर आमदार झाल्यावर आलो तर कान तुटलेल्या कपातून चहा मिळाला. नंतर आलो तर घरात टेबल, खुर्ची आली, ट्रे मधून चहा येवू लागला. आता गावची स्थिती सुधारली आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला. मी सातत्यपूर्ण काम केल्यामुळेच स्थिती सुधारली असे ते म्हणाले.

जनाई-शिरसाईमध्ये लक्ष घालणार

जनाई-शिरसाई योजनेबद्दल ते म्हणाले, या योजनेच्या स्थितीबद्दल मला माहित नव्हते. पण मी आता लक्ष घालेन, काम कसे होत नाही ते बघेन. मी ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांचे हे काम होते, पण त्यांच्याकडून ते झाले नाही. या कामाचे काय करायचे ते आता मी बघेन, असे पवार म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news