भारत-पाकिस्तान युद्ध : विजयाच्या ५० वर्षानिमित्त 'सुवर्ण विजय' व्दिसप्ताह | पुढारी

भारत-पाकिस्तान युद्ध : विजयाच्या ५० वर्षानिमित्त 'सुवर्ण विजय' व्दिसप्ताह

पुणे; पुढारी वृत्तसेवा: तीन ते १६ डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात ( भारत-पाकिस्तान युद्ध ) भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला. तेरा दिवस चाललेल्या युद्धाला ( भारत-पाकिस्तान युद्ध ) यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताचे युद्धातील रोमांचकारी क्षण ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहात पाहता येणार आहेत. ३ ते १६ डिसेंबर या काळात ‘सुवर्ण विजय द्विसप्ताह’ साजरा केला जाणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली.

प्रदर्शनीय रणगाड्याचे उद्घाटन, निबंध स्पर्धा, नामवंत चित्रकारांचे पेंटिंग्ज प्रदर्शन, १९७१ च्या युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन, व्याख्यान, देशभक्तीच्या चित्रपटांची क्लिपिंग, ७५ फूट लांब तीन रंगांच्या पडद्यावर स्वाक्षरी मोहीम, युद्धस्मारक ठिकाणी पुष्पचक्र अर्पण, शंभर फूट लांब पाण्याच्या पडद्यावर २० मिनिटांच्या थ्रीडी लेझर चित्रफीत पाहता येणार आहे.

कै.वसंतराव बागुल उद्यानात शुक्रवारी (दि. ३ डिसेंबर) सकाळी ११ वाजता प्रदर्शनीय टी-५५ रणगाड्याचे उद्घाटन लेफ्ट. जन. डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ असतील. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार व माजी आमदार मोहन जोशी यांची उपस्थिती असणार आहे. मनपा आयुक्त विक्रमकुमार, सन्माननीय खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी (दि.५) संभाजी उद्यानासमोर सकाळी ७ वाजल्यापासून पुण्यातील सुमारे २५ नामवंत चित्रकार ‘पंतप्रधान इंदिरा गांधी व १९७१ चे युद्ध’ या विषयावर प्रत्यक्ष पेंटिंग्ज (चित्र) काढणार आहेत. याचे उद्घाटन ब्रिगेडियर अजित आपटे व व्यंगचित्रकार चारुहास पंडित करणार आहेत. याचे प्रदर्शन ६ डिसेंबरपासून १८ डिसेंबरपर्यंत भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, बागुल उद्यान, शिवदर्शन येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पहाता येणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button