दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे मुंबईत पडसाद | पुढारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे मुंबईत पडसाद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी केलेल्‍या अटकेच्या कारवाईनंतर मुंबईत रात्री पडसाद उमटले.

या कारवाईचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबईतील बॅलार्ड इस्टेटजवळील ईडी कार्यालयासमोर रात्री निदर्शने करत भारतीय जनता पार्टीच्या या दडपशाहीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.

या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी प्रीती शर्मा, रूबेन मस्केरेन्हान्स यांच्यासह सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.त्यांना रात्री आझाद मैदानात आणण्यात आले. यावेळी पोलीस व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शुक्रवारी सकाळी त्यांना माझगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटले. मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन, रूबेन मस्केरेन्हान्स, सुरेश आचार्य, आदित्य पॉल, साजिद खान, वहीद खान आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रत्येक कार्यकर्त्यांची धरपकड करत पोलिसांनी उचलून पोलीस व्हॅनमध्ये आणले. अत्यंत चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी केलेल्या या अन्यायकारक क्रुरतेचा निषेध केला. यावेळी आपच्या कार्यकर्ता अस्लम मर्चंट याच्या नाकावर पोलिसाने ठोसा मारला. त्यामुळे त्यांना रक्तस्त्राव झाला. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात मूलभूत सुविधा नसल्याने ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानात पोलीसांनी आणले. आपच्या वतीने ॲड. संदीप कटके न्यायालयात बाजू मांडणार आहेत.
याबाबत प्रीती शर्मा- मेनन म्हणाल्या, एका पोलिसाने चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांना वागणूक दिल्याने त्या पोलिसांवर कारवाई व्हावी. हा प्रकार चुकीचा आहे. याचा निषेध करीत आहोत.

हेही वाचा :

Back to top button