डोंबिवलीतील मंगळसूत्र चोरी प्रकरण : इराणी कबिल्यातील दहा आरोपींची मोक्कातून मुक्तता | पुढारी

डोंबिवलीतील मंगळसूत्र चोरी प्रकरण : इराणी कबिल्यातील दहा आरोपींची मोक्कातून मुक्तता

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील मंगळसूत्र चोरी प्रकरणी दहा वर्षांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आंबिवलीच्या इराणी कबिल्यामधील दहा आरोपींची मोक्कातून मुक्तता करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

मुक्तता झालेल्यांमध्ये शेरबी युसुफ सय्यद (77), फिजा रहिम शेख (42), वासिम फिरोज इराणी (37), शकील सय्यद 42), मेहंदी सय्यद (40), साधू इराणी (33), यावर सलीम हुसेन (37), यावर काझम हुसेन (37), तरबेज जाकर इराणी (40), अख्तर इराणी (37), नासिक हाफिज खान (45) यांचा समावेश आहे. सुटका झालेले 10 आरोपी कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी कबिल्यामधील रहिवासी आहेत.

डोंबिवलीतील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी प्रकरणात रामनगर पोलिसांनी आंबिवलीच्या इराणी कबिल्यामधील 10 जणांना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) दहा वर्षांपूर्वी कारवाई केली होती. पोलिसांनी या प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध नसताना त्यांना नियमबाह्य पद्धतीने या प्रकरणात गोवले. मोक्का कायद्यांतर्गत केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवून ठाण्याच्या मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेट्ये यांनी मंगळसूत्र चोरीचा आरोप असलेल्या इराणी टोळीतील दहा आरोपींची मोक्कातून मुक्तता केली.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संजय मोरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपींतर्फे पुनीत माहिमकर, अ‍ॅड. राजय गायकवाड, अ‍ॅड. जावेद शेख यांनी काम पाहिले. पोलिसांनी प्राथमिक नोंदणी अहवालात दोन आरोपींचा उल्लेख करून उर्वरित 8 आरोपींचा उल्लेख नसताना त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसताना त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीचा ठपका ठेवल्याचे कथानक रचल्याचे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मोक्का न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून दहा आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली.

नेमके काय आहे हे प्रकरण ?

डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या श्री गणेश मंदिर येथून फेब्रुवारी 2015 रोजी दीपा टिकेकर ही महिला संध्याकाळच्या सुमारास पायी जात होती. इतक्यात दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी दीपा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर दीपा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दुचाकीचा वाहन क्रमांंक तक्रारीत नोंद नसताना पोलिसांनी कोणत्या तपासाच्या आधारे या आरोपींना अटक केली? दहा आरोपींविरुद्ध कोणते सबळ पुरावे तुमच्याकडे आहेत? तपासात अनेक त्रृटी असताना तुम्ही आरोपींना मोक्का कायदा लावला कसा? आदी प्रश्नचिन्ह पोलिसांच्या तपासावर उपस्थित करत न्यायालयाने दहा आरोपींची मोक्का आरोपीतून मुक्तता केली आहे.

Back to top button