वाहतूक कोंडीत अडकले खुद्द पोलिस अधीक्षक; स्थानिक पोलिस गायब | पुढारी

वाहतूक कोंडीत अडकले खुद्द पोलिस अधीक्षक; स्थानिक पोलिस गायब

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : नसरापूरच्या वाहतूक कोंडीवर राजगड व वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने येथील वाहतूक कोंडीचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडीचा प्रत्यय पुणे पोलिस ग्रामीण दलाचे पोलिस अधीक्षकांनीदेखील घेतला. आश्चर्याची बाब स्थानिक पोलिस रस्त्यावर नसल्याने पोलिस अधीक्षकांच्या सुरक्षारक्षक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नसरापूर-वेल्हा रस्त्यावरून मंगळवारी (दि. 19) पाचच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे वेल्हाकडे जात असताना नसरापूरच्या वाहतूक कोंडीत अडकले होते. मुख्य रस्त्यावर वाहनांची रांगच रांग लागलेली होती.

या वेळी एकही स्थानिक पोलिस वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नसल्याने पोलिस अधीक्षकांबरोबर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी चक्क वाहनातून उतरून वाहतूक कोंडी हटवली. या वेळी अधिकार्‍यांनीदेखील डोक्यावर हात मारून घेतला असल्याची चर्चा होत आहे. या वाहतूक कोंडीत त्यांना कुठेच वाहतूक पोलिस दिसला नाही, ही स्थिती अधिकार्‍यांनी अनुभवली. दरम्यान, नसरापूर शहरातील या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बोर्ड, फलक, हातगाडे, इतर विक्रेते यांना हटविण्यासाठी प्रशासन उदासीन आहे. काही केल्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिस मात्र पुणे-सातारा महामार्गावर दंड ठोकण्यात मग्न असतात. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांच्या अंदाधुंद कारभाराने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. तो अद्यापही सुरूच असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा

Back to top button