Leopard News : शिरूरच्या पूर्व भागात पुन्हा बिबट्याची दहशत! | पुढारी

Leopard News : शिरूरच्या पूर्व भागात पुन्हा बिबट्याची दहशत!

मांडवगण फराटा: पुढारी वृत्तसेवा : पूर्व भागामध्ये बिबट्याची पुन्हा दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मांडवगण फराटा, फराटेवाडी, शिरसगाव काटा, इनामगाव, नलगेमळा, घाडगेतळई, पिंपळसुटी, तांदळी, गणेगाव दुमाला, सादलगाव, वडगाव रासाई आदी भागांमध्ये शेतकर्‍यांना बिबट्या दिसून येत आहे. परंतु, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला कायमच अपयश येत आहे. आठ दिवसांपूर्वी शिरसगाव काटा येथे शेतकर्‍याला सकाळी तीन बिबटे दिसून आले होते. वीजपुरवठा रात्री- अपरात्री केव्हाही सुरू होतो. त्यामुळे नाइलाजाने शेतकर्‍यांना रात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावे लागते.

बिबट्याच्या दहशतीने शेतकरी रात्री-अपरात्री शेतावर पाणी देण्यासाठी जायला घाबरत आहे. यापूर्वी बिबट्याने अनेक शेळ्या, कुत्री, मेंढ्या, कोंबड्या आणि वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. अनेक पाळीव प्राण्यांनाही जखमी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी गोठे तयार केले आहेत. या भागामध्ये वन विभागाने यापूर्वी आठ ते नऊ बिबटे पकडले आहेत, तरी देखील मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button