नंदुरबार जिल्ह्यात पक्षांतरामुळे राजकीय समीकरणांत बदल | पुढारी

नंदुरबार जिल्ह्यात पक्षांतरामुळे राजकीय समीकरणांत बदल

नंदुरबार : योगेंद्र जोशी
लोकसभा निवडणुका घोषित झालेल्या असतानाच काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत काँग्रेसला धक्का दिला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनीही पक्षांतर करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. आपल्याच दोन प्रमुख घटक पक्षांतून झालेल्या या वजाबाकीमुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठाच झटका बसला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडी महाविकास आघाडीची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलून टाकणाऱ्या असून, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आणखी काही राजकीय फेरबदल घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. या मागची एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी अशी की, काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग 42 वर्षे म्हणजे 1967 ते 2009 पर्यंत काँग्रेसचे खासदार निवडून येण्याचा विक्रम स्थापित झाला. तथापि मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे ते वर्चस्व मोडून काढल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन्ही पंचवार्षिकला भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित जिंकून आल्या. आता सलग तिसऱ्यांदा भाजपने डॉ. हीना गावित यांना उमेदवारी घोषित केली आहे.

भाजपचे वर्चस्व पर्यायाने मंत्री गावित परिवाराचे ते वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसने पुन्हा कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून गावित यांचे भाजपतील विरोधक आणि अन्य सर्व पक्षांतील विरोधक एकत्र आले आणि भाजपने डॉ. हीना गावित यांना उमेदवारी देऊ नये, उमेदवार बदलून द्यावा, अशी मागणी लावून धरली. परिणामी मंत्री गावित परिवार एकाकी पडला असून, त्यांना प्रचंड विरोध असल्याचे चित्र निर्माण झाले. भाजप यंदा उमेदवार बदलणार अशी चर्चा त्यांच्या माध्यमातून पसरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र भाजपच्या वरिष्ठांनी पहिली पसंती दर्शवत खासदार डॉ. हीना गावित यांनाच उमेदवारी घोषित केली. त्या उलट काँग्रेसचे माजी मंत्री के. सी. पाडवी निवडणूक लढवण्याची असमर्थता सातत्याने दर्शवत असल्याने महाविकास आघाडीला अद्याप लोकसभा निवडणूक लढवणारा सक्षम उमेदवार मिळालेला नाही. महाविकास आघाडीसाठी हा धक्का आहे.

नंदुरबारमधून प्रचाराची परंपरा कायम
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचाराला नंदुरबारमधून प्रारंभ करण्याची परंपरा कायम ठेवत स्वतः राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे आदिवासी न्याययात्रा काढण्यात आली. परंतु त्याचवेळी मुंबईत काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीला हा दुसरा झटका बसला. त्यापाठोपाठ आता शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या यात्रेचा एकीकडे मुंबईत समारोप होत असतानाच नंदुरबार जिल्हा महाविकास आघाडीला हा तिसरा झटका बसला. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.

बदललेल्या समीकरणांचे संभाव्य परिणाम
नंदुरबार जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे महायुतीमध्ये असूनही युती धर्म निभवायला राजी नाही. मित्रपक्ष भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. हीना गावित यांच्यासह गावित परिवाराला असलेला त्यांचा पारंपरिक विरोध त्यांनी कायम ठेवला आहे. मंत्री डॉ. गावित यांना अडचणीत आणणारी ही स्थिती राज्यस्तरावर मुख्यमंत्री शिंदे यांना माहीत असूनही रघुवंशी यांना ते आवर घालू शकलेले नाहीत. परंतु अशातच मंत्री डॉ. गावित यांना अनुकूल असलेले उद्धव सेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी शिंदे गटाच्या नंदुरबार जिल्हा शिवसेनेत प्रवेश केला. याला काही संदर्भ असावे का? यावर राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. इकडे पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच तळोदा शहादा विधानसभेचे भाजप आमदार राजेश पाडवी यांनी खास कार्यक्रम आयोजित करून त्यांचे स्वागत केले. भाजपचे राजेश पाडवी आणि काँग्रेसचे पद्माकर वळवी हे डॉ. विजयकुमार गावित यांना खरोखरच अनुकूल असल्याचे जाहीरपणे कधी दिसले नाही. ते यापुढे डॉ. गावित यांना अनुकूल होतील का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

तळोदा शहादा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांना पुन्हा उमेदवारी मिळणे भाजपकडून अपेक्षित आहे. तथापि पद्माकर वळवी हे त्याच भागातून सलग पाच वेळा आमदार म्हणून यापूर्वी निवडून आलेले आहेत, हे लक्षात घेता, आता यापुढे पद्माकर वळवी यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष संधी देईल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अक्कलकुवा विधानसभेची जागा एकनाथ शिंदे गटाला मिळेल आणि आमशा पाडवी यांना तिथे पुन्हा आमदारकी लढवायला मिळेल, असाही अंदाज व्यक्त केला जातो. तथापि चर्चा आणि अंदाज काहीही असल्या, तरी राजकीय समीकरणे बदलणाऱ्या आणखी घडामोडी घडणे बाकी असल्यामुळे तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या वाटाघाटी कोणत्या वळणांनी जातात, हेही स्पष्ट होणे बाकी असल्यामुळे आज समोर आलेले कोणतेही राजकीय चित्र खरे मानावे अशी स्थिती नाही.

Back to top button