महापालिकेच्या स्वच्छतेला नागरिकांचे ग्रहण! स्वच्छतेनंतर नागरिक फेकतात कचरा | पुढारी

महापालिकेच्या स्वच्छतेला नागरिकांचे ग्रहण! स्वच्छतेनंतर नागरिक फेकतात कचरा

सुवर्णा चव्हाण

पुणे : सकाळी सात वाजल्यानंतर मोठ्या मेहनतीने महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांकडून बोपोडी आणि औंध रस्ता परिसराची स्वच्छता केली जाते. पण, स्वच्छता केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर कचरा आणून टाकण्यात येत असल्याचे चित्र बोपोडी-औंध परिसरात पाहायला मिळते. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांच्या मेहनतीवर नागरिकांकडूनच पाणी फेरले जात आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी सकाळी बोपोडी आणि औंध रस्त्याच्या स्वच्छतेचे काम सुरू करतात. दुपारी 12 पर्यंत स्वच्छतेचे काम सुरू असते. मात्र, सकाळी सफाई केल्यानंतरही अनेक नागरिक रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याचे दै. पुढारीच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले. भाऊ पाटील रस्त्यावर (चव्हाण वस्तीच्या समोर) असलेल्या जागेवर कर्मचार्‍यांनी कचरा उचलल्यानंतरही काही तासानंतर पुन्हा कचर्‍याचे ढीग लागत आहेत.

रात्री नऊनंतर ठिकठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले. तर औंध रस्त्यावर परिस्थिती उलट असल्याचे पाहायला मिळाले. येथील नागरिक रस्त्यावर कचरा फेकत नसून, हा परिसर स्वच्छ असल्याचे दिसून आले. बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर तर काही ठिकाणी सफाई केल्यानंतर काही तासांतच कचर्‍यांचे ढीग लागत आहेत. दुसरीकडे घरोघरी जाऊन सफाई कर्मचारी कचरा गोळा करत असूनही नागरिक मात्र रस्त्यावरच येऊन कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. काही बाहेरील नागरिक येऊन येथे कचरा टाकत आहेत.

रात्रीच्या वेळी टाकला जातो कचरा

भाऊ पाटील रस्त्यावर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून कचर्‍याच्या पिशव्या आणि इतर कचराही येथे टाकला जात असून दिवसातून दोन वेळा स्वच्छता केल्यावरही कर्मचार्‍यांच्या कामाला नागरिकच केराची टोपली दाखवत आहेत.

सफाई कर्मचार्‍यांकडून दोन वेळा बोपोडी परिसराची स्वच्छता केली जाते. पण, नागरिकांकडूनच सफाई केलेल्या जागेवर पुन्हा कचरा टाकला जातो. त्यामुळे कचर्‍याचा ढीग साचतो. रात्रीच्या वेळेस तर बाहेरील नागरिक येऊन येथे कचरा टाकतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरत नागरिक कचरा करत आहेत, हे थांबले पाहिजे, नागरिकांनी शिस्त पाळली पाहिजे. परिसर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

– स्नेहल सांगळे, स्थानिक नागरिक

हेही वाचा

Back to top button