ग्रामदैवत मंदिरांसह पक्ष कार्यालयांना मोहोळांच्या भेटी; देवधर-मुळीक यांची पाठ

ग्रामदैवत मंदिरांसह पक्ष कार्यालयांना मोहोळांच्या भेटी; देवधर-मुळीक यांची पाठ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेट्रो, चांदणी चौक प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, नदी सुधार प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी इलेक्ट्रिक बसेस आदी प्रकल्पांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत पुण्यासाठी योगदान दिले, असे मत पुणे लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी गुरुवारी (दि.14) ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर, ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसह विविध मंदिरांमध्ये दर्शन घेतले. तसेच माजी खासदार गिरीष बापट यांच्या निवास्थानासह मित्र पक्षांच्या कार्यालयांना भेट दिली.

माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, राज्यात 2014 ते 2019 च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुण्यासाठी अनेक योजना आल्या. भाजपची महापालिकेत पाच वर्षे सत्ता असताना विकासाची कामे केली. भविष्यातील शंभर वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न आहे. देशवासियांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे ठरवले आहे. यावेळी आमदार सुनील टिंगरे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, रिपाइं (आठवले गट) शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देवधर-मुळीक यांची पाठ

पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत होती. या तिघांनीही भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यासोबत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला होता. मात्र, मोहोळ यांनी देवधर व मुळीक यांच्यावर मात करत उमेदवारी मिळवली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी महायुतीच्या पदाधिकार्‍यांसमवेत कसबा गणपतीची आरती करून दर्शन घेतले. या वेळी प्रमुख पदाधिकारी हजर होते. मात्र, देवधर आणि मुळीक अनुपस्थित होते. त्यामुळे ते दोघे नाराज असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news