Nilesh Lanke : अखेर लंकेंनी तुतारी फुंकली; पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी | पुढारी

Nilesh Lanke : अखेर लंकेंनी तुतारी फुंकली; पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी कँाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकली असून प्रवेशाची औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे. आज कार्यालयात आल्यावर लंके यांचे स्वागत केले. आवश्यकता पडली तर त्यांच्या मागे उभे राहू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

लंके यांचे नाव नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी घेतले जात असून, त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली, त्यावेळी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार नीलेश लंके आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, पारनेर तालुक्यातील अतिशय कष्टाळू आणि मेहनती कार्यकर्ता म्हणून नीलेश लंके यांचे नाव घेतले जाते.

आमदार नीलेश लंके यांना वाटचाल करताना पाहिले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत लोकांसमोर जाताना आम्ही विकासाच्या गोष्टी घेऊन जाणार आहोत. राज्याच्या राजकारणात मला लोकांनी नेहमी पाठिंबा दिला आहे. जनतेची त्यांना साथ आहे. मधील काळात त्यांचे काही वेगळे निर्णय झाले असतील, पण ते लोकांसाठी काम करत आहेत. मी त्यांचे स्वागत करत आहे. निवडणूक आयुक्त नेमणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या या पंतप्रधान मोदींच्या इच्छेनुसार झाल्या या स्पष्ट आहे. केंद्र सरकारकडून ज्याप्रकारे नियुक्ती केली जात आहे ती पाहता ही मनमानी आहे.

मी साहेबांच्या विचारांसोबतच : लंके

मी शरद पवारांचे नेतृत्व कधीच सोडलेले नसल्याचे सांगून, खासदारकीच्या निवडणुकीबाबत शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगितले. तर मी येथे केवळ पुस्तक प्रकाशनासाठी आलो असल्याचे सांगितले. मी पवार साहेबांच्याच विचारांचा आहे. काल आज आणि उद्याही शरद पवारांच्या विचारधारेसोबत मी असणार आहे. नेते समोर बसलेले असताना कार्यकर्त्याने सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्यामुळे मी इथं काहीही बोलू शकत नाही. साहेब सांगतील तो आदेश आहे. साहेबांच्या मंचावरून दुसर्‍या मंचावर जाणं सोप आहे का? अशा सूचकपणे लंके यांनी आपण शरद पवारांसोबतच आहोत, हे सांगितलं आहे.

हेही वाचा

Back to top button