पुणे : मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये कायमस्वरुपी डायलिसिस आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग निवडला जातो. अचूकता, कमी छेद, शस्त्रक्रियेसाठी लागणारा कमी कालावधी आणि रुग्णालयात राहण्याचा कमी झालेला कालावधी, यामुळे सध्या रोबोटिक किडनी प्रत्यारोपणाला पसंती दिली जात आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे किडनी प्रत्यारोपणात क्रांती घडली आहे.
खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये आधी थ्री-डी इमेज निर्माण केली जाते. यामध्ये कोठे चीर द्यायची, ती किती सेंटीमीटर असावी याबाबत रोबोटिक यंत्राच्या सहाय्याने डॉक्टर आधीच अंदाज घेऊ शकतात. मानवी हातांच्या तुलनेत रोबोटिक हात अधिक चपळाईने आणि अचूकतेने काम करतात. रोबोटिक शस्त्रक्रिया स्थूल रुग्णांसाठी जास्त सुरक्षित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अनेक दशकांपूर्वी किडनी प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात कमीतकमी त्रासदायक शस्त्रक्रियेची कल्पनाच करणे अत्यंत कठीण होते. मात्र, आता रोबोटिक शस्त्रक्रियेच्या तांत्रिक प्रगतीमुळे इतर अवयवांना कमीतकमी नुकसान होते. अवयव काढताना दात्यावर आणि प्रत्यारोपण करताना रुग्णावर जखम किंवा चट्टे राहत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दोघांनाही सामान्य आयुष्य जगता येते. रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीचा अवलंब केल्याने मिनिमल इनव्हेझिव शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात क्रांती झाली आहे.
– डॉ. रुषी देशपांडे, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन
किडनी प्रत्यारोपणाच्या रुग्णांसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. पारंपरिक पद्धतीपेक्षा यामध्ये कमी आणि छोट्या चिरांचा समावेश असतो. तंतोतंत उपचार पद्धती आणि अचूकतेमुळे रक्तस्राव आणि संसर्ग यासारख्या गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये ही अचूकता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त, रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये थ्रीडी छायाचित्र मिळते आणि अचूकतेचे प्रमाण सुधारते. रोबोटिक शस्त्रक्रिया पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी त्रासदायक असते. शस्त्रक्रियेनंतर कमीत कमी वेळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना आणि लवकर मदत होते.
– डॉ. हिमेश गांधी, रोबोटिक सर्जन
मधुमेह, उच्च रक्तदाब, जीवनशैलीशी संबंधित आजार अशा विविध कारणांमुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत तरुण रुग्णांमध्ये डायलिसिसऐवजी प्रत्यारोपणाचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, अवयवदानाचे प्रमाण अल्प असल्याने पुणे विभागात 1672 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. जनजागृतीची कमतरता, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अवयवदानाची मानसिक तयारी नसणे, गैरसमज अशा विविध कारणांमुळे अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी वाढत आहे. रक्ताच्या नात्यातील किडनी न मिळाल्यास अवयदानासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडे ब्रेनडेड व्यक्तीची किडनी मिळवण्यासाठी नाव नोंदवले जाते.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशी चार विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्रे आहेत. पुणे विभागाअंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे आदी शहरांचा समावेश असून 40-45 रुग्णालय अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी मान्यताप्राप्त आहेत. मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान आणि जिवंत रुग्णाकडून केले जाणारे अवयवदान हे दोन वेगळे प्रकार आहेत. प्रत्यारोपण समितीकडे मेंदूमृत रुग्णांच्या अवयवांची माहिती आणि प्रतीक्षा यादी याचे काम मुख्यत्वेकरून केले जाते. रुग्णाला मेंदूमृत जाहीर केल्यावर बरेचदा नातेवाईक अवयवदानासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे मागणीच्या तुलनेत अवयदानाचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा