यशवंतराव चव्हाणांकडून आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी : डॉ. राजा दीक्षित | पुढारी

यशवंतराव चव्हाणांकडून आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी : डॉ. राजा दीक्षित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आधुनिक महाराष्ट्राचे आदर्श नेतृत्व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया त्यांनी रचला. साहित्य, संस्कृतीसह सर्वांगीण कार्य त्यांनी जोपासले. त्यांच्यामुळेच आजचा आधुनिक महाराष्ट्र दिसत आहे, असे प्रतिपादन राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले. स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्रमंडळाच्या वतीने यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण कला व साहित्य’ पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ मराठी अभिनेते विलास रकटे यांना ज्येष्ठ लेखक राजा दीक्षित यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

तसेच, अनिल धाकू कांबळी यांना ‘इष्टक’ या कवितासंग्रहासाठी कै. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, कवी भीमराव धुळूबुळू यांना ‘काळजाचा नितळ तळ’ या कवितासंग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’ कवी गीतेश गजानन शिंदे यांना ’सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवितासंग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, विजय ढेरे, संजय ढेरे, सचिन जाधव, फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर आदी उपस्थित होते. डॉ. राजा दीक्षित म्हणाले की, यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकार चळवळ, सुसंस्कृत राजकारणासाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असेही या वेळी त्यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button