Loksabha election 2024 : आता विविध परवान्यांसाठी असेल ‘एक खिडकी’

Loksabha election 2024 : आता विविध परवान्यांसाठी असेल ‘एक खिडकी’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी विविध परवाने घ्यावे लागतात. त्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू केली जाणार आहे. निवडणूकविषयक विविध परवानग्यांसाठी संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि नोंदणीकृत पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात तसेच उमेदवार किंवा प्रतिनिधींनी लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षात अर्ज करणे आवश्यक आहे.

उमेदवार किंवा प्रतिनिधींनी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात तात्पुरते पक्ष कार्यालय उघडण्याबाबत लागणार्‍या परवान्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तसेच कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, ध्वनिक्षेपण परवान्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलिस अधिकार्‍यांकडे अर्ज करावा. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात फेरी, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्याचे आयोजन, ध्वनिक्षेपणाबाबत परवाना मिळण्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलिस अधिकारी तर लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील परवान्याकरिता जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षातील पोलिस अधिकार्‍यांकडे अर्ज करावा.

अर्जासोबत पोलिस विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात स्टेज, बॅरिकेड आणि भाषणाकरिता उंच व्यासपीठ (रोस्ट्रम) उभारण्याबाबत लागणार्‍या परवान्याकरिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापत्य व विद्युत शाखा आणि अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.

हेलिपॅडसाठी परवानगी बंधनकारक

हेलिपॅडचे बांधकाम आणि हेलिकॉप्टर उतरविण्याबाबत लागणार्‍या परवान्याकरिता ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखा, पुणे शहर हद्दीसाठी पुणे पोलिस आयुक्त कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड हद्दीकरिता पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापत्य व विद्युत शाखा आणि अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news