Vinesh Phogat : विनेश ऑलिम्पिक शर्यतीत कायम | पुढारी

Vinesh Phogat : विनेश ऑलिम्पिक शर्यतीत कायम

पतियाळा, वृत्तसंस्था : पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीतून स्टार पैलवान बजरंग पुनिया आणि रवी दहिया हे रविवारी बाहेर पडले असतानाच महिला मल्ल विनेश 50 किलो गटातून विजेतेपद मिळवत ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरीसाठी पात्र ठरली. ती आता पुढील महिन्यात बिश्केक येथे होणार्‍या एशियन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होणार आहे; पण त्यापूर्वी झालेल्या चाचणी फेरीत जबरदस्त ड्रामा झाला. विनेशने महिलांच्या 50 किलो आणि 53 किलो गटातील चाचणी सुरूच होऊ दिली नाही. 53 किलो वजन गटात ऑलिम्पिकच्या आधी एक चाचणी आयोजित करण्याचे लेखी आश्वासन विनेश मागत होती. (Vinesh Phogat)

भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष खा. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी विनेश ही पैलवानांच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलानाचे नेतृत्व करीत होती. ती येथे 50 किलो वजन गटात चाचणी देण्यासाठी आली होती. (Vinesh Phogat)

विनेश यापूर्वी 53 किलो वजन गटात खेळत होती. परंतु, या गटातून अंतिम पंघाल हिने भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे. त्यामुळे विनेश 50 किलो वजन गटातून स्पर्धेत उतरली; पण त्याच वेळी तिने 50 आणि 53 अशा दोन्ही गटांतून खेळण्याची परवानगी मागितली. त्यामुळे दोन्ही गटांतील इतर पैलवान तक्रार करू लागल्या. यातून चाचणी स्पर्धेत मोठा ड्रामा झाला.

53 किलो गटातून अंतिम पंघालने ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. त्यामुळे अस्थायी समितीने याबाबत नवीन नियम बनवला आहे. या गटातून देशातील चार वरिष्ठ खेळाडूंना चाचणी फेरीत प्रवेश दिला जाईल आणि यातील विजेत्या मल्लाची अंतिम पंघालशी कुस्ती लावण्यात येईल आणि त्यातील विजेत्या पैलवानाला ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय कुस्ती संघटनेविरोधात आंदोलन करणारे बजरंग, विनेश यांना चाचणी स्पर्धा न खेळता थेट ऑलिम्पिकला प्रवेश हवा आहे, असा आरोप त्यांच्यावर आधीपासूनच होत आहे. त्यात आता बजरंग चाचणी हरला असल्याने त्याचे ऑलिम्पिक स्वप्न भंगले आहे. तर विनेशने दोन गटांतून खेळण्याचा हट्ट केल्याने चाचणी स्पर्धेत गोंधळात गोंधळ झाला. पण शेवटी तिला ही परवानगी मिळाली. यातील 50 किलो गटात ती विजेती ठरली.

50 किलो गटात शिवानी पवारला हरवले

या स्पर्धेत विनेश 50 किलो आणि 53 अशा दोन वजनी गटांतून चाचणीसाठी आखाड्यात उतरली. यापैकी 53 किलो गटात ती सेमीफायनलमध्ये पराभूत झाली. रेल्वेच्या अंजूने 1-10 असा मोठा विजय मिळवला. 50 किलो गटातून ती विजेती ठरली. अंतिम लढतीत विनेशने शिवानी पवारवर 11-6 गुणांनी विजय मिळवला. या लढतीत ती 3-6 अशी पिछाडीवर होती; पण नंतर तिने दोन गुणांची कमाई करीत गुणातील फरक कमी केला. याच आक्रमकतेत तिने आणखी 6 गुणांची कमाई करीत कुस्ती जिंकली. या विजयामुळे विनेश आता ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरीसाठी पात्र ठरली आहे.

Back to top button