अन्यायकारक कराविरोधात नागरिकांचा संताप; ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा | पुढारी

अन्यायकारक कराविरोधात नागरिकांचा संताप; ढोल-ताशांच्या गजरात मोर्चा

खडकवासला/वारजे : पुढारी वृत्तसेवा : अन्यायकारक मिळकतकराविरोधात मंगळवारी शिवणे, उत्तमनगर येथील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. एनडीए रस्त्यावरून शिवणे गावात ढोल-ताशांच्या गजरात पायी मोर्चा काढून करसंकलन कार्यालयाला प्रतीकात्मक टाळे टोकून या वेळी महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे व कोपरे नागरी कृती समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. अन्यायकारक करवाढ रद्द करावी, पिंपरी- चिंचवड, डोंबिवली महापालिकेच्या धर्तीवर समाविष्ट गावांना सवलत द्यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

खासदार सुप्रिया सुळे, हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, निमंत्रक सुरेश गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, नगरसेवक सचिन दोडगे, सायली वांजळे, अतुल दांगट, शेखर दांगट, त्रिंबक मोकाशी, अतुल धावडे, शुक्राचार्य वांजळे, शेखर मोरे, महेंद्र दांगट, राहुल दांगट, संजय धावडे, अरुण दांगट आदींसह नागरिक या मार्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ’दहापट कर अन्यायकारक आहे तो रद्द करावा. महापालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करावी.’ कृती समितीचे निमंत्रक सुरेश गुजर म्हणाले, ’विकासाला चालना मिळावी म्हणून 34 गावांचा समावेश केला. मात्र, आता भरमसाट करवसुलीमुळे महापालिकेसह नागरिक त्रस्त झाले आहेत.’ अतुल दांगट म्हणाले, ’अनेक पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.’ अतुल धावडे यांनी स्वागत केले. शेखर मोरे यांनी आभार मानले.

भरमसाट करामुळे परिसरातील कंपन्या बंद पडून रोजगार बुडणार आहे. नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ आली. सर्व समाविष्ट गावांत याविरोधात आंदोलने करण्यात येणार आहेत.

– श्रीरंग चव्हाण, अध्यक्ष,नागरी कृती समिती

महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

ग्रामपंचायतीपेक्षा 10 पट कर अधिक आहे. त्याऐवजी ग्रामपंचायतीच्या दुप्पट कर घ्यावा, अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली. कराची रक्कम आवाक्याबाहेर गेली आहे. निवासी व बिगरनिवासी मिळकतीच्या करआकारणीत अनेक चुका असल्याचे नागरिकांनी सांगितले. अन्यायकारक कर रद्द न केल्यास पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.

हेही वाचा

Back to top button