Crime News : दागिने चोरणारी महिला जेरबंद; लाखोंचा ऐवज जप्त | पुढारी

Crime News : दागिने चोरणारी महिला जेरबंद; लाखोंचा ऐवज जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दागिने, रोकड असा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या महिलेला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत परिसरातून अटक केली. महिलेकडून 235 ग्रॅम दागिने, रोकड असा 11 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अश्विनी अवि भोसले (वय 23, रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. इंदापूर एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून आठ लाखांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.

महिला एसटी बसने पुण्याकडे निघाल्या होत्या. त्या वेळी तिच्या पिशवीतून साडेपंधरा तोळे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. अश्विनी भोसलेकडून 235 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा 11 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सूर्यकांत कोकणे, सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्या पथकाने केली.

वडगावात खून; कुर्ला स्थानकावर बेड्या

वडगाव बुद्रुकमधील बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम कामगाराचा मृतदेह आढळून आला. चौकशीअंती व वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा खून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी बिहार येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा आरोपींना कुर्ला रेल्वे स्थानकातून बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. पिंटू दास (वय 26) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दाम्पत्याकडील रोकड हिसकावली

जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सुरेश नामदेव खंकाळ (वय 45, रा. जयसिंग हाऊसजवळ, देहूरोड) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त संजय पाटील, पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, उपनिरीक्षक तानाजी शेगर तपास करत आहेत.

हेही वाचा

Back to top button