नंदुरबार ब्रेकींग : नंदूरबारमध्ये काॅंग्रेसला धक्का, पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश | पुढारी

नंदुरबार ब्रेकींग : नंदूरबारमध्ये काॅंग्रेसला धक्का, पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश

नंदूरबार : ऑनलाइन डेस्क 
राहुल गांधी यांचे थोड्याच वेळात धुळे शहरात आगमन होणार असून तेवढ्यात नंदूरबारमध्ये राजकीय उलथापालथ होणारी बातमी हाती आली आहे. नंदूरबारमध्ये काॅंग्रेसला धक्का लागला असून पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चेस आज स्पष्टोक्ती मिळाली आहे. पद्माकर वळवी यांनी मंगळवार (दि.१२) रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली होती. तर भाजपची राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक होणार आहे.

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी, १३ मार्च रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे नेते अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. प्रवेश झाल्यानंतर ‘भाजपा जनता पार्टीचा विजय असो’, ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या.

कोण आहेत पद्माकर वळवी? 
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली असून ते मंत्री होते. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी एक म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. 2009 मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

नंदुरबारचे पालकमंत्री
पद्माकर वळवी हे तेराव्या विधानसभेत आमदार होते. त्यावेळी त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही होते. पद्माकर वळवी यांच्या पत्नीही राजकारणात कार्यरत आहेत. तर त्या सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.

Back to top button