बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदार संघाच्या एकमेकींविरोधातील संभाव्य उमेदवार असणार्या खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शुक्रवारी (दि. 8) बारामतीत जळोची येथील मंदिरात समोरासमोर आल्या. या वेळी दोघींनी एकमेकींशी संवाद साधत गळाभेटदेखील घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात बारामती लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. खासदार सुळे यांनी आपल्या मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. गावच्या यात्रा-जत्रा तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये खासदार सुळे आता जाताना दिसत आहेत. Supriya Sule- Sunetra Pawar
तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचीही जोरदार चर्चा आहे. अजित पवार गटाकडून तसा प्रचार देखील सुरू झाला दिसत आहे. सुनेत्रा पवार या स्वत:देखील मतदारसंघात चांगल्याच अॅक्टिव झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत. नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यात शुक्रवारी (दि. 8) रात्री सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघीही बारामतीतील जळोची येथील काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या. तेव्हा दोघींही समोरासमोर आल्या. त्या वेळी त्यांनी एकमेकींशी संवाद साधत गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले. येणार्या काळात दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या राहणार असल्या, तरी आजच्या भेटीने मतदार मात्र संभ्रमात पडला आहे. Supriya Sule- Sunetra Pawar
हेही वाचा