पथारी व्यावसायिकांवर नाममात्र कारवाई : माहिती अधिकारातून बाब समोर | पुढारी

पथारी व्यावसायिकांवर नाममात्र कारवाई : माहिती अधिकारातून बाब समोर

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाने एका परवान्यावर एकापेक्षा अधिक ठिकाणी व्यवसाय करणारे, तसेच परवान्यावर पत्ता असलेले ठिकाण सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करणार्‍या एकाही पथारी व्यावसायिकांवर करवाई केली नसल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीतून समोर आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडून पथारी व्यावसायिकांवर नाममात्र कारवाई केली जात असल्याचा आरोप वडगाव शेरी नागरिक मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनी केली आहे.
या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कल्याणीनगर, विमाननगर, पाचवा मैल आणि खराडीमध्ये आयटी पार्क परिसर आहे. आयटी पार्कमधील कर्मचारी नाश्यासाठी कंपन्यांच्या बाहेर असलेल्या पथारी व्यावसायिकांकडे येतात. यामुळे या भागात अनधिकृती पथारी व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याणीनगर, विमाननगर, पाचवा मैल आणि खराडी भागात मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक स्टॉल लावत आहेत. परवाना नसल्यास संबंधित पथारी व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते.
ही कारवाई टाळण्यासाठी पथारी व्यावसायिक एकच परवाना दोन ते तीन ठिकाणी वापरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, परवान्यावर उल्लेख केलेल्या व्यवसायाचा प्रकार सोडून इतर व्यवसायदेखील ते करत आहेत. परवान्यावर असलेला पत्ता सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करण्याचे प्रकार या भागात दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी महापालिकेचा महसूल बुडत आहे. अतिक्रमण विभाग कारवाई करताना फक्त पथारी व्यावसायिकांचे साहित्य जप्त करतात, पण एक परवाना किती ठिकाणी वापरला आहे, याबद्दल कारवाई पथकाकडून केली जात नाही.
अतिक्रमण विभाग केवळ कागदोपत्री कारवाई करीत आहे. पथारी पुनर्वसन कायद्यांतर्गत ही करवाई केली जात नाही. व्यावसायिक एका परवान्यावर तीन ते चार ठिकाणी पथारी लावतात. मात्र,  त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.  यामुळे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पथारी व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
– आशिष माने, अध्यक्ष, वडगाव शेरी नागरिक मंच
अतिक्रमण विभागाकडून नियमितपणे कारवाई केली जात आहे. माहिती अधिकारामध्ये मागवलेल्या कागदपत्रांमध्ये आम्ही किती कारवाई केली याची माहिती दिली आहे. कारवाईची माहिती गोळा करताना एकच परवाना किती ठिकाणी वापरला, या प्रकारची वर्गवारी केली नाही. अनधिकृत पथारी व्यावसायिकांवरही लवकरच कारवाई केली जाईल.
-विनोद दुधे, अधिकारी, अतिक्रमण विभाग, नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय

परवान्यांकडे लक्ष देण्याची गरज

  • अतिक्रमण विभागाकडून नाममात्र कारवाई होत असल्याने बुडतो महापालिकेचा महसूल
  • एका परवान्यावर एकापेक्षा अधिक ठिकाणी व्यवसाय करणार्‍यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
  • परवान्यावरील पत्ता सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय
  • कारवाई टाळण्यासाठी पथारी व्यावसायिक एकच परवाना वापरतात दोन ते तीन ठिकाणी

हेही वाचा

Back to top button