महाशिवरात्री : मंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे घेतले दर्शन; शेतकरी-कष्‍टकऱ्यांसाठी केली प्रार्थना | पुढारी

महाशिवरात्री : मंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे घेतले दर्शन; शेतकरी-कष्‍टकऱ्यांसाठी केली प्रार्थना

परळी वैद्यनाथ ; पुढारी वृत्‍तसेवा राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (शुक्रवार) महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिराला भेट दिली. मुंडे यांनी मध्यरात्री वैद्यनाथाचे दर्शन घेत महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले.

आज देशात सर्वत्र महाशिवरात्रीचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा वैद्यनाथांचे दर्शन घेत राज्यातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या अशी प्रार्थना प्रभू  वैद्यनाथांच्या चरणी केली.

दरम्यान धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने सबंध वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे 21 प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीमुळे सबंध वैद्यनाथ मंदिर व परिसर लखलखून निघाला असून, भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या दिसून येत आहेत.

सोवळ्या वस्त्रात धनंजय मुंडे वैद्यनाथ मंदिरात दाखल झाले व त्यांनी विधिवत पूजन करून वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख, अनिल तांदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, सुरेश टाक, राजेंद्र सोनी, अभयकुमार ठक्कर, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button