मार्केट यार्डातील डमी अडत्यांवर आजपासून कारवाई : सभापती दिलीप काळभोर | पुढारी

मार्केट यार्डातील डमी अडत्यांवर आजपासून कारवाई : सभापती दिलीप काळभोर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यावर डमी अडत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गाळ्यावरील नियमबाह्य डमी अडत्यांवर बाजार समिती प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या 15 फुटांच्या नियमाबाबतही रोजच कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सचिव डॉ. राजाराम धोंडकर, उपसभापती संचालक दत्तात्रय पायगुडे आदी उपस्थित होते. डमी अडत्यांमुळे बाजारात दिवसभर किरकोळ विक्री सुरू होती.

तसेच डमी अडते गाळ्यासमोरील 15 फुटांचा नियम पाळत नसल्याने बाजारात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे डमी अडत्यांना आळा घालण्यासाठी एका गाळ्यावर दोन मदतनीस ठेवता येतील, असा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा डमी अडत्यांची संख्या वाढल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काळभोर यांनी नमूद केले. काळभोर म्हणाले की, प्रत्येक गाळ्यावरील डमी अडत्यांची पाहणी केली जाणार आहे. गाळ्यावर नियमबाह्य डमी अडते आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल. तसेच गाळाधारकांनी 15 फुटांपेक्षा अधिक जागेवर माल लावल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
गाळ्यावरील डमी अडत्यावर कारवाई करण्यासाठी जबाबदारी बाजार समिती अधिकारी व कर्मचार्‍यांवर सोपविली जाणार आहे. तसेच, 15 फुटांचा नियम मोडणार्‍या अडत्यांची दंडाची पावती केली जाणार आहे. डमी अडते आणि 15 फुटांच्या नियमाबाबतच्या कारवाईचा आढावाही घेतला जाणार असल्याचे दिलीप काळभोर यांनी सांगितले.

डमी अडत्याला बाजारात बंदी

फळबाजारात एका डमी अडत्याने शेतकर्‍यांना मारहाण केल्याचा नुकताच प्रकार उघडकीस आला आहे. त्या डमी अडत्याला बाजारात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्या गाळ्यावर डमी अडता होता, त्या गाळामालकाला नोटीस देऊन खुलासा मागविला आहे. खुलासा समाधानकारक न वाटल्यास काही दिवस परवाना रद्दची कारवाई केली जाईल.

बाजार समिती शेतकर्‍यांच्या पाठीशी

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांची बाजार समिती आहे. त्यामुळे बाजारात शेतकर्‍यांवर अन्याय झाला, तर त्यास न्याय मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाल्यास त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता बाजार समितीकडे तक्रार करावी. ही बाजार समिती कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी आहे. बाजार आवारात शेतकर्‍यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

शेतकरीहिताच्या धोरणाला गती

संचालक मंडळामुळे बाजार समितीतील निर्णयास गती आली आहे. तसेच शेतकरी हिताच्या व बाजार विकासाच्या धोरण आखणीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहारात पारदर्शकता आली असून, शेतकर्‍यांसह बाजार घटकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण केले जात आहे.

– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा

Back to top button