केर्न्स : गुगल मॅपच्या आधाराने इच्छित ठिकाण गाठण्याचा पर्याय काही वेळा खाईत लोटणारा ठरू शकतो, याचा प्रत्यय फिलीप मेयर व मार्सेल शोएन या जर्मन पर्यटकांना आला. गुगल मॅपचा आधार घेत हे दोघे पर्यटक 37 मैल आत गेले. पण, जसे आत जाईल, तसे नेटवर्क गायब होत असताना या दोघांकडे परत फिरणेही कठीण होते, आपण जंगलात हरविल्याची कुणकुण त्यांना लागली होती आणि ज्यावेळी रस्ताच दिसेनासा झाला, त्यावेळी यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
हे जर्मन पर्यटक केर्न्स ते बॅमेगा या प्रवासात होते. पण, गुगल मॅपचा आधार घेत मार्गोत्क्रमण करत असताना त्यांचा एक रस्ता चुकला आणि येथेच ते भरकटले. मोबाईल नेटवर्क गेल्यानंतर ते पुढे सरकत राहिले आणि एक ठिकाण असेही आले, ज्यावेळी त्यांची जीप पूर्णपणे चिखलात रुतली. ही जीप इतकी चिखलात रुतली होती की, तेथून बाहेर काढणेही कठीण होते. अशा परिस्थितीत त्यांनी ही जीप तिथेच सोडून देत रस्ता शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, चालत रस्ता शोधणेही किती कठीण आहे, याची त्यांना लवकरच प्रचिती येत गेली. नदी पात्रातून मार्ग काढत असताना एका मगरीलादेखील त्यांना सामोरे जावे लागले.
असेच मजल-दरमजल करत जवळपास 60 किलोमीटर्स चालल्यानंतर त्यांना एक छोटेसे खेडे लागले आणि यानंतर त्यांना दिलासा मिळाला. गुगलने यानंतर दोन्ही पर्यटक सुरक्षित परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला, त्याचबरोबर याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे नमूद केले. अर्थात, गुगल मॅपने दिशा भरकटण्याची ही पहिली वेळ अजिबात नव्हती. काही महिन्यांपूर्वी कॅलिफोर्नियातील एक गट रस्ता चुकल्यानंतर चक्क वाळवंटापर्यंत पोहोचला होता, त्या आठवणीला येथे उजाळा मिळाला.