उकळत्या पाण्याची नदी! | पुढारी

उकळत्या पाण्याची नदी!

लिमा : पृथ्वीतलावर रहस्यमय ठिकाणांची काहीही कमी नाही. उलटपक्षी मनुष्याला अशा ठिकाणांचा शोध घेण्यातच अनेक मर्यादा जाणवत आल्या आहेत. अशाच काही रहस्यमय ठिकाणांपैकी एक ठिकाण पेरूमध्ये वसले असून, येथे चक्क उकळत्या पाण्याची नदी आहे, जेथे 24 तास पाणी सातत्याने उकळत असते.

बॉयलिंग रिव्हर या नावाने ओळखली जाणारी ही नदी 7 किलोमीटर लांब आहे. एका ठिकाणी ही नदी 80 फूट रुंद होते आणि ती 16 फूट खोलवर आहे. आता या नदीचे पाणी उकळत असल्याने येथे सुप्त ज्वालामुखी असावा, असे वाटणे साहजिक आहे. पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ही नदी नैसर्गिकद़ृष्ट्याच गरम नदी असून, यामुळे शास्त्रज्ञ याचा थर्मल नदी असा उल्लेख करतात.

अमेझॉन जंगलाच्या मधोमध या नदीमध्ये ‘सॉल्ट रिव्हर व हॉट रिव्हर’ नावाच्या दोन नद्या मिळतात. या नद्या एकत्र आल्यानंतर पाण्याचे तापमान 60 डिग्री सेल्सिअसपेक्षाही अधिक होते. साहजिकच, अगदी प्राणीही या पाण्यात उतरू शकत नाहीत आणि सतत उकळत असणार्‍या या नदीच्या प्रवाहात एखादा प्राणी चुकून खाली पडला, तर तो जागीच गतप्राण होणार, हेदेखील निश्चित असते. अगदी मनुष्यालादेखील या पाण्यातून चालणेही दुरापास्त ठरत आले आहे.

Back to top button