इंदापुरात विधानसभेचाच गाजावाजा; हर्षवर्धन पाटलांचे संकल्प मेळावे | पुढारी

इंदापुरात विधानसभेचाच गाजावाजा; हर्षवर्धन पाटलांचे संकल्प मेळावे

जावेद मुलाणी

इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. भावी खासदार कोण? याची चर्चा रंगली असताना इंदापूर तालुक्यात मात्र लोकसभेआधी निर्णय विधानसभेचा; मग पाहू लोकसभेचे, असेच चित्र दिसून येत आहे. माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटांमध्ये संकल्प मेळावे घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. काही झाले तरी 2024 ची विधानसभा आपण भाजपकडूनच लढणार, असा पवित्रा घेत त्यांनी प्रचाराची जणूकाही सुरुवात केली आहे.

दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभांचा धडाका लावला असून, गावोगावच्या कार्यकर्त्यांची जुळणी करून ते मोट बांधत आहेत. विकासकामांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांत इंदापूरचा आपण कसा चेहरामोहरा बदलवला, हे सांगत आणखी कामे आपण भविष्यात कसे करणार आहोत, याची समर्पक मांडणी करताना आमदार भरणे दिसत आहेत. त्यामुळे तालुक्याच्या आजी-माजी आमदार यांना लोकसभेपेक्षा विधानसभेची घाई जास्त झाली आहे, असेच चित्र दिसते आहे. सन 1991 पासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे यापूर्वी निवडणुकीच्या वेळेस एकत्र होते.

यांनी एकत्रितपणे हर्षवर्धन पाटील यांना सातत्याने विधानसभेला फसविले, अशी पाटील यांची भावना झाली आहे. आता मात्र शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झालेले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्यास त्यांना पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्यायचा की भाजपचा उमेदवार निवडून द्यायचा की आणखी वेगळा निर्णय घ्यायचा? हा एक मोठा प्रश्न इंदापुरात उभा राहिला असून, पाटील गट कुणाला मदत करणार, याची चर्चा सुरू आहे. त्याच अनुषंगाने पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सातही जिल्हा परिषद गटांमध्ये ’संकल्प 2024 : संकल्प विजयाचा’ या नावाखाली मेळावे भरविणे सुरू केले आहेत. यातून विधानसभेचीच तयारी हर्षवर्धन पाटील यांनी सुरू केली आहे,

भाजप गुंता कसा सोडविणार, हाच प्रश्न यापूर्वी लोकसभेला ज्या-ज्या वेळी भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांना मदत केली, त्या वेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील एकत्रितपणे दोघांनाही मदत केलेली आहे. नेहमीच लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीवेळी इंदापूरचा विषय गाजत आलेला आहे. आतापर्यंत तो विषय काँग्रेसच्या गोटामध्ये गाजत होता, आता तो भाजपच्या गोटात गाजत आहे. त्यामुळे भाजप आता हा प्रश्न कसा सोडवतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

उमेदवारीसाठीच होणार चढाओढ

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी’ अशी थेट लढत झाली होती. यंदा मात्र राष्ट्रवादी व भाजप यांची महायुती असल्याने उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी कोणाला मिळते, यासाठी चढाओढ लागल्याची दिसत आहे.

हेही वाचा

Back to top button