डोक्यावरील कर्जाने त्याला बनवलं चोर : आठ गुन्ह्यांचा छडा, सोने जप्त | पुढारी

डोक्यावरील कर्जाने त्याला बनवलं चोर : आठ गुन्ह्यांचा छडा, सोने जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटच्या नादातून त्याच्यावर कर्ज झाले. गावाकडील जमीन विक्रीतून आलेले पैसेदेखील त्याने उडवले. कर्जासाठी लोकांनी त्याच्याकडे तगादा लावला. त्यातूनच त्याने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यास सुरुवात केली. शेवटी त्याला गुन्हेगारी मार्गाने कारागृहाची वाट दाखविली. जबरी चोरी करणार्‍या एका चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. सुमित गोविंद इंगळे (वय 28, रा. मारुंजी हिंजेवाडी, मूळ बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, चतुःश्रृंगी आणि रावेत पोलिस ठाण्यातील तब्बल आठ गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख 60 हजार रुपये किंमतीचे साडेपंधरा तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात दागिने चोरीच्या तीन घटना घडल्या होत्या. तब्बल दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला. दरम्यान, पोलिस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेडगे आणि राजू वेंगरे यांना माहिती मिळाली की, प्रयेजा सिटी रोड, गिरिजा हॉटेलच्या बाजूला असलेल्या बस थांब्याजवळ एक तरुण संशयास्पद स्थितीत थांबला आहे. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीला नंबर नाही. त्याने मागील वीस दिवसांपूर्वी आनंदनगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरी केली आहे.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांनी सापळा रचून पथकाच्या मदतीने संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर इंगळे याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने इतर ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. इंगळे हा मूळचा बार्शी तालुक्यातील राहणार आहे. तो आईसोबत मारुंजी-हिंजवडी परिसरात राहतो. वडिलांचे निधन झाले आहे. गावाकडील शेती विक्रीतून आलेले पैसे त्याने उडवले. शेअर मार्केटचा त्याला नाद आहे. त्यातून त्याच्यावर कर्ज झाले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम,सहायक पोलिस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, कर्मचारी आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, विकास बांदल, अमोल पाटील, स्वप्निल मगर, अक्षय जाधव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Back to top button