Pune Drug Case : अमली पदार्थ तस्करीचे ’रेकॉर्ड ब्रेक’ | पुढारी

Pune Drug Case : अमली पदार्थ तस्करीचे ’रेकॉर्ड ब्रेक’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग माफियांनी शिक्षणसंस्था, पब, हॉटेल्स त्याचबरोबर शहरातील चौकांपर्यंत एलएसडी (स्टॅम्प) आणि गांजा, कोकेन, चरस, हेरॉइन असे अमली पदार्थ विक्रीचे जाळे विणले असल्याचे आजवरच्या कारवाईतून स्पष्ट झाले. मागील दोन वर्षांत पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीत सहभागी असलेल्या तब्बल 415 जणांवर कारवाई करताना 27 कोटींहून अधिक अमली पदार्थ पकडले. तर 10 वर्षांत 1506 आरोपी पकडताना त्यांच्याकडून 45 कोटींहून अधिक अमली पदार्थ पकडण्यात आले. तर 2024 च्या अवघ्या दोन महिन्यांत 10 आरोपींना पकडत पुणे पोलिसांनी 3600 कोटींहून अधिकचे अमली पदार्थ पकडले.

आत्तापर्यंत एकूण 1931 जणांना ताब्यात घेतले आहे. वर्षाच्या शेवटीला ललित पाटीलच्या टोळीवरील कारवाई सर्वात मोठी वाटत असतानाच पुणे पोलिसांनी कुरकुंभमधील कारखाना उद्ध्वस्त केला. यामुळे मागील कित्येक दशकात पकडले नव्हते एवढे अमली पदार्थ पुणे पोलिसांनी अवघे दोन महिन्यांत पकडले. 10 वर्षांत 45 कोटींहून अधिक, तर अवघ्या दोन महिन्यांत पुणे पोलिसांनी 3600 कोटींहून अधिक ड्रग्ज पकडून आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. नुकताच एका ट्रकमधून मेफेड्रॉन बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. त्या अगोदर आधल्या दिवशीच पिंपरी पोलिसांनी मेफेड्रॉन जप्त केले. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा सहभाग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मागील दहा वर्षांचा विचार करता अमली पदार्थ तस्करीचा आलेख चढता- उतरता राहिला आहे. मात्र, 2024 ची सुरुवातच मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडून झाली आहे. त्यातच त्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. 2013 मध्ये 65 कारवायांमध्ये 114 आरोपींना पकडत त्यांच्याकडून 1 कोटी 68 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 2014 मध्ये 66 गुन्हे, 97 आरोपी अन् 68 लाखांचे अमली पदार्थ, 2015 मध्ये 54 गुन्हे, 90 आरोपी अन् 1 कोटी 32 लाखांचे अमली पदार्थ, 2016 मध्ये 63 गुन्हे, 80 आरोपी अन् सव्वादोन कोटींचे अमली पदार्थ, 2017 मध्ये 78 गुन्हे, 106 आरोपी अन् 1 कोटी 33 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर 2018 मध्ये 1 कोटी 10 लाख, 2019 मध्ये 3 कोटी, 2020 मध्ये 1 कोटी 95 लाख, 2021 मध्ये 2 कोटी 58 लाख, 2022 मध्ये 9 कोटी 93 लाख तर 2023 मध्ये 17 कोटी 84 लाखांचे मेफेड्रॉन पकडले गेले. तर 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांतच मागील अनेक दशकांचे रेकॉर्ड ब—ेक झाले. एकाच गुन्ह्यात 10 हून अधिक आरोपी अटक करून पुणे पोलिसांनी 1850 किलोहून अधिक तब्बल 3 हजार 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले.

हेही वाचा

Back to top button