पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे बाजार समितीच्या फळविभागात शेतकर्याला एका डमी आडत्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. मात्र, बाजार समिती प्रशासनाला तब्बल तीन दिवसांनी जाग आली आहे. डमी आडत्या (चवली दलाल) मोसंबीला कमी भाव देतो हे सांगितल्याने संबंधित डमी आडत्याने शेतकर्याला मारहाण केली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्याच्या जीवावर मार्केट सुुरू आहे त्यांनाच मारहाण केली जात असेल, तर शेतमाल विक्रीसाठी पाठवायचा का नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड यांनी शुक्रवारी एका आडत्याकडे 108 क्रेट्स संत्री विक्रीला आणली होती. त्या शेतकर्याकडे संत्रीसह मोसंबीचीही बाग आहे. मोसंबीदेखील बाजारात विक्रीसाठी आणायची होती. त्यामुळे मोसंबीला किती भाव मिळत आहे, याची चौकशी करायला गायकवाड हे एका आडत्याच्या गाळ्यावर गेले. तेथे ते चर्चा करत असताना त्यांच्या पाठीमागे सुरेश भोहिने नावाचा डमी आडत्या उभा होता. चर्चेवेळी शेतकरी गायकवाड यांनी डमीकडे मोसंबीला भाव कमी मिळतो, असे सांगितले.
डमी आडत्याने ते ऐकल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने शेतकर्याला लाथा मारत कानशिलात लगावल्या. त्यानंतर शेतकरी गायकवाड हे घाबरले होते. दरम्यान, रविवारी बाजारात आल्यानंतर त्यांनी ही घडलेली घटना पत्रकारांसह आडते असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या कानावर घातली. मात्र, बाजारात शेतमाल विक्रीला पाठवायचा असल्याने पुढे अडचणी नको म्हणून तक्रार करण्यास शेतकरी घाबरला. बाजार समितीने मात्र याची काहीही दखल घेतलेली नाही.याबाबत शेतकरी आदिनाथ गायकवाड म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून मी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीस पाठवित आहे. मोसंबीच्या भावाची चौकशी करताना आडत्यांना डमी आडत्याकडे शेतमालाला कमी भाव मिळतो हे सांगितले. तेवढे ऐकून डमी आडत्याने मला लाथा मारल्या आणि कानशिलात लगाविली.
हा प्रकार दोन- तीन दिवसांपूर्वी घडला. संबंधित शेतकर्याने या प्रकाराबाबत तक्रार केलेली नाही. मात्र, विभागप्रमुख यांना या प्रकाराची चौकशी करायला सांगितली आहे. तसेच, संबंधित डमी आडत्याला मार्केटमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.
हेही वाचा