केंजळ येथे महावितरणचे उपकेंद्र उभे राहणार; आंदोलनाला यश

केंजळ येथे महावितरणचे उपकेंद्र उभे राहणार; आंदोलनाला यश

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्याचा पूर्वेकडील 18 गावांमधील बागायती क्षेत्राला सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून केंजळ (ता. भोर) येथे 33/11 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार केंजळ येथील गट नंबर 682मधील 80 आर क्षेत्र महावितरण कंपनीला देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे हस्तांतरित केले जाणार आहे, अशा आशयाचे आदेश राज्याच्या महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभागाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी पुणे विभागाच्या आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे महावितरणच्या उपकेंद्रासाठी आम्ही आंदोलन करणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिली.

केंजळमध्ये महावितरणचे उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. मात्र, उपकेंद्र उभारणीच्या प्रस्तावात मंत्रालयीन स्तरावर वारंवार त्रुटी काढल्या गेल्या. त्रुटींची पूर्तता करून 6 महिन्यांपूर्वी फेरप्रस्ताव पाठविला होता. परंतु, मंत्रालयीन स्तरावर त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नव्हती. यासाठी पुणे-सातारा महामार्गावर आंदोलन करण्याता इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी दिला होता.

तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याबाबत निवेदन दिले होते. त्यावर पवार यांनी दि. 21 फेब्रुवारी रोजी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिवांना त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिल्या. त्यानुसार 23 तारखेला उपसचिवांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना संबंधित जमीन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) महावितरणला देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी 11 सप्टेंबर 2023 रोजी महावितरणची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी केंजळ येथे महावितरणचे उपकेंद्र उभारणीचा विषय घेतला होता. आता दि. 23 फेब्रुवारीला पवार यांनी जागा हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यामुळे भोरच्या पूर्वेकडील भागातील शेतकर्‍यांनी पवार यांचे आभार मानले आहेत, असे बाठे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news