जनावरांचा चारा संपला : दूध उत्पादक हतबल; पशुपालक व शेतकरी चिंताग्रस्त | पुढारी

जनावरांचा चारा संपला : दूध उत्पादक हतबल; पशुपालक व शेतकरी चिंताग्रस्त

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याची मागणी वाढत आहे. अशातच  फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच मोकळी शिवारे, तसेच माळरानेही चार्‍याअभावी ओसाड पडल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत चालला आहे. बागायती भागातील उभा ऊसही कारखान्यांना गाळपासाठी जाळून तोडला जात असल्याने हिरवा चारा संपुष्टात आला आहे. हिरव्या चार्‍याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे.

इंदापूर तालुक्यातील बहुतांश भागांत विहिरी, हातपंप यांची पाणीपातळी कमी होऊन खोलवर गेली आहे. उजनीचा पाणीसाठा फेब—ुवारी महिन्यातच वजा 16 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चार्‍याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. यापुढे ऐन उन्हाळ्यात जनावरे जगवायची तरी कशी? हा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. बागायती भागात उजनी गाळपेर जमिनीत काही प्रमाणात गवत उगवून आल्याने यावर जनावरे ताव मारत आहेत. हिरव्या चार्‍याची टंचाई असल्याने दुधात मोठी घट व दुधाचे घसरलेले दर, यामुळे दूध उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.

हेही वाचा

Back to top button