‘जलजीवन’च्या ठेकेदारांना कोटींचा मलिदा; मात्र गावातील नळाला पाणी नाही | पुढारी

‘जलजीवन’च्या ठेकेदारांना कोटींचा मलिदा; मात्र गावातील नळाला पाणी नाही

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनच्या दौंड तालुक्यातील एकाही योजनेतून पाणी मिळाले नसल्याची स्थिती असताना ठेकेदारांना मात्र सुमारे 55 कोटी रुपये अदा करून दौंड पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा पाणी विभाग नामानिराळा झाला आहे. योजनेतील एकाही गावच्या नळाला पाणी आलेले नाही. नळ पाणीपुरवठ्याच्या योजनेचे कामकाज करणार्‍या प्रत्येक ठेकेदाराला या विभागाने जास्तीत जास्त 3 कोटी आणि कमीत कमी 40 लाख अशा रकमा अदा केलेल्या आहेत. सर्वाधिक रक्कम दिलेल्या खोपडी गावासाठी तीन कोटी रुपये अदा केलेले आहेत. या गावासाठी 3 कोटी 53 लाख हा निविदा रकमेतील आकडा असून, तीन कोटी अदा केल्याने यातील अवघ्या पन्नास लाख रुपयांच्या रकमा ठेकेदारांच्या शिल्लक आहेत आणि योजना पूर्ण झाली की नाही? हा प्रश्न ऐरणीवरचा विषय आहे.

भांडगाव गावासाठी तीन कोटी 50 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. योजनेसाठी 4 कोटी 15 लाख 91 हजार रुपयांची निविदा रक्कम आहे. योजना अद्याप पूर्ण झाली की नाही, याची खरी माहिती या विभागाचे अधिकारी देत नाहीत. लिंगाळीच्या कामासाठी 1 कोटी 50 लाख रुपये देण्यात आलेले आहेत आणि या गावच्या योजनेसाठी एकूण खर्च 1 कोटी 67 लाख 84 हजार रुपयांचा आहे. जवळपास या योजनेमध्ये 90 टक्के रक्कम दिलेली आहे. मात्र, या गावच्या योजनेचे कामकाज कुठल्या स्थितीत आहे, हे सांगणे गावकर्‍यांना अवघड पडत आहे. पाटेठाण गावामध्ये योजनेच्या निविदेची रक्कम एक कोटी 40 लाख 72 हजार असून, या योजनेत देऊ केलेली रक्कम निविदा रकमेपेक्षा जास्त असून, एक कोटी पन्नास लाख एवढी अदा केलेली आहे. निविदा रकमेपेक्षा जास्त रक्कम अदा केल्यामुळे नक्की या ठिकाणी काय झालेले आहे, या विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिल्याशिवाय समजणे अवघड आहे.

खानोटा गावासाठी 3 कोटी 51 लाख 18 हजार रुपयांची निविदा रक्कम आहे. या गावच्या ठेकेदाराला 2 कोटी 70 लाख रुपये सादर करण्यात आलेले आहेत. मात्र, योजना अद्यापही पूर्ण झालेली नसून ती कधी पूर्ण होणार आणि कधी नळाला पाणी येणार, या चिंतेत नागरिक असून, ठेकेदार आणि अधिकारी, याची किंचितही काळजी करीत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. खुटबाव गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेला 1 कोटी 52 लाख 33 हजार रुपयांची निविदा रक्कम आहे. या ठेकेदाराला 1 कोटी 20 लाख रुपये अदा केलेले आहेत. मात्र, गावच्या योजनेचा नक्की काय विषय आहे. ती किती पूर्ण आहे, पूर्ण झाली असेल तर ती गावकर्‍यांना ताब्यात देण्यात आलेली आहे का, असे अनेक प्रश्न या योजनेकडे पाहताना नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय झालेला आहे.

नायगाव या गावासाठी 47 लाख आणि 83 हजार रुपये एवढी छोटी रक्कम निविदेमध्ये दाखविण्यात आलेले आहे. या ठेकेदाराला 20 लाख रुपये अदा केले आहेत. जवळपास निम्मे पैसे या ठेकेदाराला दिले असले तरी या गावच्या योजनेची आजची अवस्था काय आहे, हे गावकर्‍यांना सांगता येत नाही, याची माहिती हे अधिकारीही सांगत नाहीत. पडवी गावची नळ पाणीपुरवठा निविदेतील रक्कम 1 कोटी 79 लाख 89 हजार एवढी आहे. ठेकेदाराला 1 कोटी 10 लाख रुपये अदा केलेत. मात्र, ही योजना मुख्य वितरिकेच्या दुसर्‍या टप्प्याच्या जागेसाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे.

ठेकेदाराची माहिती आणि सरपंच आणि ग्रामसेवकांची माहिती, यात नक्की ही योजना काय आहे, हे या अधिकार्‍यांनी ठेकेदाराशिवाय कोणालाही सांगता येत नाही. या सर्व प्रकरणांमध्ये नळ पाणीपुरवठ्याचा फज्जा उडाला की काय, असा एका बाजूला प्रश्न असला तरी तोंडावर आलेल्या उन्हाळ्यामध्ये नागरिकांच्या या हक्काच्या नळ पाणीपुरवठ्यातील योजनेचा लाभ त्यांना मिळेल की नाही, हा प्रश्न खर्‍या अर्थाने ऐरणीवरचा विषय ठरलेला आहे.

हेही वाचा

Back to top button