नाशिकला साकारणार राज्यस्तरीय हाय परफाॅर्मन्स सेंटर | पुढारी

नाशिकला साकारणार राज्यस्तरीय हाय परफाॅर्मन्स सेंटर

नाशिक : वैभव कातकाडे

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळावी यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाच्या वतीने मिशन लक्ष्यवेध राबवले जात आहे. या अंतर्गत नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल टेबल टेनिस या खेळासाठी हाय परफॉर्मन्स सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरमुळे राज्यातील खेळाडूंना एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेसह महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदके मिळविण्यासाठी राज्यातील क्रीडामंत्री संजय बनसाेडे यांच्या पुढाकारातून मिशन लक्ष्यवेध ही संकल्पना राबवली जात आहे. या अंतर्गत ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांचे ध्येय गाठण्याकरिता नियाेजनबद्ध प्रयत्न करण्यासाठी १२ ऑलिम्पिक क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पाेर्ट्स एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा केंद्र अशी क्रीडा प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारली जाणार आहे.

२० खेळाडूंसाठी सुविधा
टेबल टेनिस खेळाडूंसाठी नाशकातील विभागीय क्रीडा संकुल येथे २० खेळाडूंसाठी निवासी प्रशिक्षणाची सुविधा असणार आहे. या सेंटरद्वारे क्रीडा प्रशिक्षण केंद्रामधील खेळाडूंच्या सरावासाठी तसेच मूल्यांकनासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच सेंटरसाठी आवश्यक क्रीडा सुविधा व क्रीडा साहित्यांची देखील खरेदी केली जाणार आहे.

स्पाेर्ट्स एक्सलन्स सेंटरमध्येही नाशिक
विभागीय स्तरावरील स्पाेर्ट्स एक्सलन्स सेंटरसाठीदेखील नाशिकचा समावेश करण्यात आलेला आहे. या माध्यातूनही क्रीडाविषयक पायाभूत सुविधा असणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी नवीन क्षितिज विस्तारले आहे.

हाय परफाॅर्मन्स सेंटरमधील सुविधा
तज्ज्ञ व्यवस्थापक, नामांकित क्रीडा मार्गदर्शक, सहायक क्रीडा मार्गदर्शक, फिटनेस ट्रेनर्स, खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करणारे तज्ज्ञ, डाॅक्टर्स, प्रशिक्षक, खेळाडूंचा विमा, प्रशिक्षकांनाही मार्गदर्शन आदी सुविधा असणार आहे.

नाशिकमध्ये टेबल टेनिसचे खेळाडू लक्षात घेता हाय परफाॅर्मन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी आणखी काय सुविधा देता येतील याबाबत लवकरच बैठक घेणार आहे. याचबराेबर ॲथलेटिक्सच्या दृष्टीने ही नाशिकचा विचार सुरू आहे. – सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा विभाग.

Back to top button