पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रक्रिया न होणार्या कचर्यावर (रिजेक्ट) प्रक्रिया करता येईल का? याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतरही जुना कचरा बायोमायनिंग करून रिकाम्या केलेल्या जागेवर हा कचरा टाकून सायंटिफिक लँडफिलिंग करण्याची निविदा प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे उरुळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये पुन्हा कचर्याचे संकट घोंघावण्याची शक्यता आहे.
शहरात गोळा होणार्या कचर्यातील प्रक्रिया न करता येणारा कचरा अर्थात कापड, गाद्या, उश्या, काच, चिनी मातीच्या वस्तू, राडारोडा देवाची उरुळी येथील कचरा डेपोमध्ये टाकून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने लँडफिलिंग करण्यात येते. लँडफिलिंग केल्यानंतर त्यावर झाडेही लावण्यात येतात. शहरातील कचर्यात साधारण 5 ते 10 टक्के असा कचरा असतो, तर उर्वरित कचर्यावर प्रक्रिया केली जाते. सायंटिफिक लँडफिलिंगचे काम नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आले असून, नुकतेच डेपोतील लँडफिलिंगची जागा तसेच संबधित ठेकेदाराचे कामही संपले आहे. महापालिका आयुक्तांनी नुकतीच कचरा डेपोची पाहणी केली. त्या वेळी लँडफिलिंगमध्ये कापड, गाद्या, उश्या आणि राडारोडा असा प्रक्रिया होणारा कचरा आढळून आला.
त्यामुळे आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली तसेच संबंधित ठेकेदारावरही कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयुक्तांनी लँडफिलिंगऐवजी या वस्तूंवर प्रक्रिया होईल, याची तपासणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. मात्र, घनकचरा विभागाने पर्याय शोधण्याऐवजी पुन्हा कचरा डेपोमध्ये सायंटिफिक लँडफिलिंगची निविदा काढली. यासाठी एनजीटीच्या आदेशानंतर बायोमायनिंग करून मोकळी केलेली डेपोच्या आवारातील जागा वापरण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा अशा कचर्याचा डोंगर तयार होणार आहे.
कचरा कुजून तयार होणार्या 'लिचेट'मुळे (द्रवरूप काळा पदार्थ) येथील जलस्रोत दूषित झाले आहेत. सायंटिफिक लँडफिलिंग करताना या 'लिचेट'वर प्रक्रिया करण्यासाठी प्रतिलिटर जवळपास पावणेदोन रुपये ठेकेदाराला देण्यात आले. कचरा डेपोमध्ये महापालिकेने यापूर्वीच 'लिचेट'वर प्रक्रिया करण्यासाठी आरओ प्लांट उभारला. परंतु, सायंटिफिक लँडफिलिंगमध्ये निर्माण होणारे 'लिचेट' हे येथील एका विहिरीत गोळा केले जाते. तसेच त्यात पाणी मिसळून पुन्हा ते लँडफिलिंग केलेल्या ढिगार्यावर फवारण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, 'लिचेट'वर प्रक्रिया केल्याचे बिल ठेकेदाराला इमानेइतबारे अदा केले जाते.
सायंटिफिक लँडफिलिंगसाठी यापूर्वी पुणे कॅन्टोन्मेंटच्या कचरा डेपोवरील जागेवर लँडफिलिंगची निविदा काढली होती. परंतु, तिला प्रतिसाद मिळाला नाही. या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यायांचा शोध सुरू आहे. तोपर्यंत या कचर्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी थोड्या कालावधीसाठी सायंटिफिक लँडफिलिंगची निविदा काढण्यात आली आहे.
– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका
हेही वाचा