अमली पदार्थांची माहिती पोलिसांना कळवा | पुढारी

अमली पदार्थांची माहिती पोलिसांना कळवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांजवळ अमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास किंवा संशयास्पद परिस्थिती आढळल्यास त्याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला तातडीने कळविणे अनिवार्य आहे, असे स्पष्ट निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. पुणे शहरातील उघडकीस येत असलेल्या अमली पदार्थसेवनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सर्व शैक्षणिक संस्थांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्यानुसार महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ विभाग, उपकेंद्र परिसरातील विद्यार्थ्यांजवळ अमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तसेच संशयास्पद परिस्थिती आढळल्यास याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला तातडीने कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या प्रकटनानुसार महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ विभाग अथवा केंद्र परिसर तसेच विद्यापीठ उपकेंद्र परिसरात अमली पदार्थविषयक सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांमध्ये सध्या तरुणांना अमली पदार्थसेवनासाठी प्रवृत्त करून व्यसनाधीनता निर्माण करणार्‍या वाढत्या प्रवृत्तींबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. स्थानिक पोलिस प्रशासन अशा प्रकारच्या सर्व समाजविघातक कृतींची दखल गंभीरपणे घेत आहेच. परंतु, सर्व महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठ विभागांनीही आपल्या स्तरावर दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे.

विद्यार्थ्यांजवळ अमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास किंवा संशयास्पद परिस्थिती आढळल्यास, याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला तातडीने कळविणे अनिवार्य आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी आणि अमली पदार्थ व्यसनांमुळे होणार्‍या गंभीर परिणामांची माहिती देण्यासाठी आवश्यक असे विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणावर प्रबोधन घडविणारे समुपदेशनाचे कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात यावेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button