सरकार आत्ताच जागे का झाले? : नाना पटोले यांचा सवाल | पुढारी

सरकार आत्ताच जागे का झाले? : नाना पटोले यांचा सवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत आंदोलक मनोज जरांगेंनी यापूर्वी आमच्यावरही टीका केली, तेव्हा सरकारमधील लोक काहीही बोलले नाहीत. आता जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. शिवराळ भाषा वापरून मराठा समाज निवडणुकीत फडणवीस आणि भाजपला जागा दाखवून देईल, असा इशारा दिला. त्यानंतर सरकार जागे झाले. तेव्हा सरकारला जाग का आली नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पटोले सोमवारी पुणे दौर्‍यावर आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, जरांगे पाटील यांची शिवराळ भाषा आजची नाही.

त्यांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केले तेव्हापासून ते मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर आम्हाला देखील शिव्या घातल्या. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घातल्यानंतर सरकारला का जाग आली? असा सवाल उपस्थित करीत आम्ही काय माणसे नाही का? आम्ही शिव्या दिल्या, याचे समर्थन करीत नाही. पण, चित्र कसे आणि का बदलले, हे सर्वांसमोर असल्याचे पटोले म्हणाले. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचे मराठा समाजावर उपकार आहेत, असे सांगत आहेत.

मात्र, उपकार कोणाचे कोणावर आहेत, हे निवडणुकीमध्ये समजेल. एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आला, तर दुसरीकडे मराठा समाजाला 2018 मध्ये जे आरक्षणाचे लॉलिपॉप दाखविण्यात आले तेच लॉलिपॉप आतादेखील दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा जास्त काळ चालणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र वायरल होत आहे. मात्र, त्यांनी कितीही पत्र व्हायरल केले तरी जनतेला हे पचनी पडणार नाही. त्यांना याची फळे भोगावी लागणारच आहेत असे ते म्हणाले.

ड्रगमाफिया जावई आहेत का?

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. आज ड्रगमाफियांचे जाळे पसरले आहे. ड्रगमाफिया काय जावई आहेत का? गुटखा विक्री होते, विक्री करणारे जावई आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असून, प्रकाश आंबेडकर यांना उद्या शक्य नसल्यास 28 फेब्रुवारीला पुन्हा बोलू, असेही ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button