मांजरीतील स्मशानभूमीला ‘मरणकळा’ : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

मांजरीतील स्मशानभूमीला ‘मरणकळा’ : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
Published on
Updated on

मांजरी : पुढारी वृत्तसेवा : मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांना अनेकवेळा निवेदनही दिले आहे. मात्र, या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या स्मशानभूमीची तातडीने देखभाल, दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमीमध्ये अनेक असुविधा असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ज्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार होतात, त्या ठिकाणी असलेले बिडाचे चौथरे वारंवार चोरीला जात आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना या चौथर्‍यात लाकडे व गोवर्‍या रचने अवघड झालेले आहे. यामुळे या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये रखवालदार नेमण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीसाठी येथे बराच वेळा पाण्याचीही व्यवस्था नसते. रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्याची आवश्यकता आहे.

परिसरात स्वच्छतेचाही अभाव असून, मोकाट कुत्री घाण करीत आहेत. या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याची गरज आहे. सावडल्यानंतरची राख ड्रेनेजलाइनमधून नदीकडे सोडली जाते. ती देखील बर्‍याच वेळा तुंबलेली जात असल्याने ड्रेनेजवाहिनी नादुरुस्त होत आहे. या गावात मयत पास देण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. या उपाययोजनांसाठी प्रस्ताव तयार करून तत्काळ निधी मंजूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासनाचे या स्माशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शेख, सुमीत राखपसरे, राहुल खलसे आदींनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

मांजरी बुद्रुक येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या गावातून महापालिका कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करते. मात्र, नागरिकांना पायभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे
दुर्लक्ष होत आहे.

– प्रवीण रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते

या स्मशानभूमीच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रस्ताव संबंधित विभागाला दिला असून, लवकरच ही कामे पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

– बाळासाहेब ढवळे, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news