मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोड धरणातून आवर्तन | पुढारी

मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोड धरणातून आवर्तन

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून घोड नदीपात्र तसेच उजवा कालव्याला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी घोड नदीवरील बंधार्‍यांची पाहणी करावी. बंधार्‍यांतून पाण्याची गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी, बंधार्‍यांची आवश्यक ती दुरुस्ती करून नवीन ढापे टाकण्यात यावेत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

घोड धरणामध्ये सध्या 67 टक्के पाणीसाठा आहे. कडक उन्हामुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांश जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके जळू लागली आहेत. अनेक ठिकाणी चारा देखील उपलब्ध नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे घोड धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. पाणी सोडण्याबाबत शेतकरी तसेच नदीकाठावरील नागरिक सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेर जलसंपदा विभागाने शेतकर्‍यांच्या मागणीची दखल घेत घोड धरणातून घोड नदीपात्र व उजवा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याने घोड नदीवरील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, नलगेमळा, गांधलेमळा, खोरेवस्ती, गणेगाव दुमाला येथील सर्व बंधारे भरण्यात येणार आहेत. तसेच, या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीकाठावरील काही गावांचा देखील पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटणार आहे. मात्र, बंधारे पूर्णक्षमतेने पाण्याने भरल्यानंतर त्या बंधार्‍यांमधून पाण्याची गळती होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्यांदा बंधार्‍यांची दुरुस्ती करून नवीन ढापे टाकावेत. यंदा पुन्हा पाणी सुटेल, याची शाश्वती नसल्याचे शेतकरी संजय घाटगे यांनी सांगितले.

इनामगाव ग्रामस्थांची दर उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात मोठी फरपट होते. मात्र, या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळेत पाणी आल्याने पिके वाचतील, अशी आशा आहे. जनावरांच्या पाण्याचा व चार्‍याचा प्रश्न सुटणार आहे. परंतु, घोड नदीमधील बंधार्‍यामधून होणारी पाण्याची गळती वेळेत थांबवली गेली नाही, तर या भागाला येणार्‍या काही दिवसांत पुन्हा दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असे श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी यांनी सांगितले. या आवर्तनामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे तसेच पुढील काही दिवस नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटण्यास मदत झाली आहे. किमान दोन महिने शेतकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा

Back to top button