पहिल्या टप्प्यात 11 हजार उमेदवार झाले शिक्षक : 20 वर्षांतील सर्वात मोठी भरती  | पुढारी

पहिल्या टप्प्यात 11 हजार उमेदवार झाले शिक्षक : 20 वर्षांतील सर्वात मोठी भरती 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या 20 वर्षांतील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा रविवारी (दि.25) रात्री पूर्ण करण्यात आला. जवळपास 11 हजार जणांना शिक्षकपदाची नोकरी अन् आयुष्यभराची भाकरी मिळाली. त्यामुळे अकरा हजार शिक्षकांची भरही राज्यातील शाळांमध्ये पडली आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. मात्र, या उपरही कोणाच्या काही शंका असल्यास त्याचे अधिकृतरीत्या निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची रचना करण्यात आली आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

सूरज मांढरे म्हणाले, शिक्षण विभागातर्फे पूर्णपणे पारदर्शक व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण केली गेली. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाजमाध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले. पात्र उमेदवारांच्या व्यक्तिगत संदेशांनाही उत्तर दिले. अधिकृत न्यूज बुलेटीन पोर्टलवर दररोज प्रसारित करण्यात आले. तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे इ-मेलद्वारे संपर्क साधावा.

पारदर्शी प्रक्रिया; सर्व प्रश्नांचे निराकरण

या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये, यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार्‍यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलिस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. पात्रताधारकांना संभ—मित करणार्‍या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या, असे नमूद करून मांढरे म्हणाले, या प्रक्रियेदरम्यान जेव्हा-जेव्हा काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षणमंत्री आणि प्रधान सचिव यांनी अत्यंत तातडीने व प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले.

‘नवशिक्षकांनी परिपूर्ण योगदान द्यावे’

सोमवारी निवड न झालेल्या उमेदवारांमध्ये देखील भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याची भावना असून, त्यांनी ती बोलून दाखवली आहे. एकंदरीत इतक्या उचित पद्धतीने निवड झालेले सर्व नवीन शिक्षक, विद्यार्थी घडवण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षादेखील सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button