Sindhudurg News : तोंडवळी रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; पर्यटकांचाही पाठिंबा | पुढारी

Sindhudurg News : तोंडवळी रस्त्यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको; पर्यटकांचाही पाठिंबा

उदय बापर्डेकर

आचरा : पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवण तालुक्यातील तोंडवळी -तळाशील येथे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्णतः खड्डयाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे दुरवस्था झालेल्या तोंडवळी- तळाशील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करत तोंडवळी ग्रामस्थांनी आचरा – मालवण रस्त्यावरील तोंडवळी फाटा येथे आज (दि.२६) सकाळी रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. Sindhudurg News

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी दुपारी आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेऊन वरिष्ठ अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क करून दिला. खराब झालेल्या रस्त्याचे येत्या दोन दिवसांत खड्डे बुजवले जातील. तसेच रस्त्याच्या कामासाठी निधीला मंजुरी मिळवून घेतली जाईल, असे आश्वासन सर्वगोड यांनी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन येत्या आठ दिवसांसाठी स्थगित केले. याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. Sindhudurg News

या आंदोलनात तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या मनस्वी चव्हाण, सुजाता पाटील, अनन्या पाटील, नाना पाटील, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, ज्ञानेश गोलतकर, समीरा पाटील, सुमित्रा झाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आचराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, मालवण पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नादोस्कर तसेच आचरा व मालवण पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते.

Sindhudurg News  ग्रामस्थ व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक

बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू आंदोलनस्थळी दुपारी उशिराने दाखल झाल्याने त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रस्त्याच्या प्रश्नांवरून ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी मोठ्या मोठ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना रस्त्यावरून हटवण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थ व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमकी उडल्या. पोलिसांनी ग्रामस्थांना रस्त्यावरून बाजूला घेत अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात पुन्हा चर्चा घडवून आणली. उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी ग्रामस्थ आंदोलनावर ठाम असल्याने वरिष्ठ अधिकारी सर्वगोड यांच्याशी संपर्क करून दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाला तोंडवळी -तळाशील येथे आलेल्या पर्यटकांनीही पाठिंबा दिला.

हेही वाचा 

Back to top button