खुद्द शरद पवारच होमपीचवर अ‍ॅक्टिव्ह | पुढारी

खुद्द शरद पवारच होमपीचवर अ‍ॅक्टिव्ह

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ अशी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागल्याने खुद्द शरद पवारच आता होमपीचवर उतरले आहेत. मंगळवारी (दि. 27) बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. तर, शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले.

येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ह्या शरद पवार गटाकडून उमेदवार असणार आहेत. तर, समोरून त्यांच्याच घरातील उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच शरद पवार हे आज मंगळवारी लोकसभा पुरंदर, वेल्हे-भोर-मुळशी, इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला मतदारसंघांतील आढावा सकाळी दहापासून पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात घेणार आहेत. त्यामुळे आज होणार्‍या आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Back to top button