तडका : परीक्षा, पण कुणाची? | पुढारी

तडका : परीक्षा, पण कुणाची?

सध्या परीक्षांचा सीझन आहे. परीक्षा जवळ आल्या की आई-वडिलांचे बीपीच्या गोळ्यांचे डोस कमी-अधिक अथवा जास्तच होत असतात. विशेषतः दहावी आणि बारावी हे दोन मैलाचे दगड पार केले की, जग जिंकल्याची भावना निर्माण होते. मग अगदी ज्युनिअर केजीपासून ते थेट दहावीच्या किंवा बारावीच्या सराव परीक्षेपर्यंत केलेल्या सगळ्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि विशेषत्वानं आईनं झोकून देऊन केलेल्या प्रयत्नांचं सार त्याला किंवा तिला मात्र तीन तासांत मांडायचं असतं. आईचं महत्त्व इथं फार मोठं आहे; कारण आजकाल मुलांच्या शिक्षणाची ‘बागडोर माँ के हाथों में होती हैं.’ तर हे सगळं साररूपी सूत्र शेवटी त्या विशिष्ट विषयाच्या तीन तासांच्या परीक्षेमध्ये उतरवणं किती कठीण बाब असेल नाही? बर्‍याच आया तिकडे पेपर सुरू झाल्याची घंटा वाजली की, त्याच शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या परिसरात विविध देवतांच्या स्तोत्रांचं अखंड पठण करीत असतात. एवढं सगळं करून शेवटी नैया पार करण्यासाठी देवच लागतात, हेच या महान संस्कृतीचं मोठेपण आहे.

बरं, नेमके आजूबाजूला अनेकांची कर्तृत्ववान मुलं नेमकी जास्त हुशार असतात आणि अशा कर्तृत्ववान मुलांच्या गर्दीत आपलाही पाल्य चमकलाच पाहिजे यासाठी कोणतीही कसर ठेवली जात नाही. मग त्यात नवस आले, उपास-तापास आले, पारायण आलं आणि अनेक महाराज आले. शिवाय ग्रामदेवता, कुलदेवता, शिर्डी साईबाबा हेसुद्धा लागतच असतात. एवढंच नव्हे, तर या काळात देवाला पाण्यात ठेवणारी मंडळीही या देशात कमी नाहीत. बरं, हे देव पाण्यात ठेवायचे म्हणजे नेमके कधी ठेवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर पहिल्या पेपरपासून ते निकाल लागेपर्यंत म्हणजे साधारण तीन महिने ते पाण्यात ठेवावे लागतील.

देव बिचारे इतके दिवस पाण्यात राहण्यापेक्षा याचं काम करून टाकलेलं बरं, या तत्त्वानं निकालात फेरफार करून या विद्यार्थ्याला तळातून उचलून थेट वर आणून ठेवत असावेत. कारण हा/ही नापास झाले किंवा कमी मार्क पडले आणि त्यानं/तिनं रिपीट केलं तर पुढच्या वर्षी पुन्हा तीन महिने पाण्यात काढावे लागणार, या भीतीनं देवांना सुद्धा हुडहुडी भरत असेल. बहुतांश पालकांना पाल्याची तयारी पूर्ण झाली आहे, केवळ त्याला परीक्षा केंद्रात काही व्यत्यय असू नये, अशी इच्छा असते. काही पालकांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं भवितव्य अवघड आहे, हे माहीत असल्यामुळं भरपूर व्यत्यय असणारं परीक्षा केंद्र आवडत असतं.

संबंधित बातम्या

आई आणि वडील या दोघांसाठी परीक्षेचा निकाल महत्त्वाचा असतो, याचं कारण म्हणजे पुढे त्याचं करिअर काय होणार, हे ठरणार असतं आणि दुसरं कारण म्हणजे बुद्धिमत्तेच्या बाबतीत परीक्षार्थी कुणावर गेला आहे, याचाही फैसला होणार असतो. कमी मार्क मिळणारा पाल्य वडिलांवर गेलेला असतो आणि अर्थातच बुद्धिमान मुलगा किंवा मुलगी हा आईचा डीएनए घेऊन आलेला असतो, यावर एकदा विश्वास ठेवला की, संसार सुखाचा होतो; पण एकंदरीतच परीक्षा काळात परीक्षा पालकांची, विद्यार्थ्यांची, देवांची की शिक्षकांची? नेमकी कुणाची असते हेच समजत नाही.

Back to top button