Crime News : घरफोडीच्या पाच घटनांमध्ये 25 लाखांचा ऐवज चोरी | पुढारी

Crime News : घरफोडीच्या पाच घटनांमध्ये 25 लाखांचा ऐवज चोरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सकाळनगरमधील दोन, पाषाण, आंबेगाव बुद्रुक आणि सोमवार पेठेत घरफोडीच्या विविध घटनांमध्ये चोरट्यांनी 25 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. शहरात एकाच दिवसात घरफोडीचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या गुन्ह्यात बाणेर -काळेनगर येथे भरदिवसा दोन सदनिका फोडण्यात आल्या. याप्रकरणी एका 43 वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला 23 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा वाजता खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या वेळी अज्ञाताने त्यांच्या घराचे कुलूप उचकटून बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 17 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तक्रारदार सायंकाळी साडेपाच वाजता घरी परत आल्या. त्या वेळी घरफोडीचा प्रकार समोर आला. दरम्यान, तक्रारदार महिलेच्या शेजार्‍यांच्या बंद सदनिकेतदेखील चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे, अशी माहिती सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.

65 हजारांचा ऐवज लंपास

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंद फ्लॅटचे कुलूप आणि कडी-कोयंडा उचकटून 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कैलास बाबूराव लोकरे (वय 30, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दागिन्यांसह साड्यांची चोरी

बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून अज्ञाताने घरातील सोन्याचे दागिने आणि साड्या चोरून नेल्याचा प्रकार चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाषाण येथे घडला. याप्रकरणी एका 58 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 23 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका बांधकाम व्यावसायिकाला भेटण्यासाठी पाषाण येथे गेल्या होत्या. त्या वेळी अज्ञाताने त्यांच्या सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून सदनिकेत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व साड्या चोरी करून नेल्या.

दुकानातून सोन्याच्या वस्तू चोरीला

दुकानाचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञाताने दुकानातील एक लाख 31 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू चोरून नेल्याची घटना सोमवार पेठेतील अगरवाल बिल्डिंग येथे घडली. याप्रकरणी उंड्री येथे राहणार्‍या 67 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 फेब—ुवारीला सायंकाळी सहा ते दुसर्‍या दिवशी सकाळी सव्वादहा या वेळेत घडला.

हेही वाचा

Back to top button