कोरोना काळात पॅसेंजरचे वाढवलेले दर पूर्ववत : रेल्वे प्रशासनाचे आदेश | पुढारी

कोरोना काळात पॅसेंजरचे वाढवलेले दर पूर्ववत : रेल्वे प्रशासनाचे आदेश

दौंड : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांना मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा देऊन तशा पद्धतीने वाढीव प्रवासभाडे मागील तीन वर्षांपासून आकारायला सुरुवात केली होती. विशेषत: दौंड-पुणे या मार्गावरील डेमूसाठी 45 रुपये एवढे तिकीट आकारले जात होते. यावर सर्वप्रथम दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते, याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेने वाढवलेले हे दर मागे घ्यावेत यासाठी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आले असून हे दर पूर्ववत करण्यात आले आहेत.

यापूर्वी फक्त सकाळी 7.05 मिनिटांनी सुटणार्‍या दौंड-पुणे या शटल गाडीला 20 रुपये तिकीट आकारले जायचे. दुसरीकडे मार्ग तोच आणि किलोमीटर तेवढेच असताना अन्य पॅसेंजर गाड्यांसाठी 45 रुपये दर आकारला जायचा. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. याबाबत वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तिकिटाचे दर कमी व्हावेत म्हणून पाठपुरावा केला होता. अखेर याबाबतची सूचना रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (दि. 22) जारी केली. त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आता या कामाचे श्रेय लाटण्याकरिता विविध पक्ष व संघटना सोशल मीडियावर आपले तुणतुणे वाजवत आहेत.

हेही वाचा

Back to top button