Pune : पादचार्‍यांचा जीव मुठीत; पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात | पुढारी

Pune : पादचार्‍यांचा जीव मुठीत; पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या रस्त्यावरील नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, रस्ता ओलांडता यावा, यासाठी अतिक्रमणमुक्त पदपथ आणि आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल असणे गरजेचे आहे. मात्र, काळेपडळ ते ढेरे कंपनी या रस्त्यावर यापैकी काहीच नाही. त्यामुळे पादचार्‍यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांचा वॉकिंग सर्व्हे केला असून, सर्व्हेमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’ने विविध रस्त्यांची पाहणी केली. काळेपडळ ते ढेरे कंपनी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याचे आढळून आले. भविष्यातील दुसरी महापालिका म्हणून पाहिले जात असलेल्या हडपसर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काळेपडळमधील रेल्वेगेट कायमचे बंद करून भुयारी मार्ग तयार केला आहे. मात्र, या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी समस्यात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

हडपसर ते ससाणेनगर, महंमदवाडी, हांडेवाडी या मुख्य रस्त्यापासून 400 मीटर आणि काळेपडळकडून 400 मीटर दूर, असे मध्येच भुयारी मार्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांना वळसा घालून पुढे जावे लागते. परिणामी वाहतूक कोंडीत भरच पडली आहे. या परिसरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रशासनाने रस्त्यावरून चालणार्‍या नागरिकांचा विचारच केला नसल्याचे पाहायला मिळते. रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांसाठी सुस्थितीमध्ये व अतिक्रमणमुक्त पदपथ असणे गरजेचे असताना या रस्त्यांवर पदपथाचा पत्ताच नाही. शिवाय चौकांमध्ये सिग्नल यंत्रणाही नाही. त्यामुळे पादचार्‍यांना चालताना व रस्ता ओलांडताना वाहनांशी लपंडाव खेळावा लागतो.

भाजी विक्रेत्यांसह बेशिस्त रिक्षांचा अडथळा

ढेरे कंपनी परिसरात दिवसेंदिवस मोठ्या सोसायट्यांसह नागरिकरणामध्ये भर पडत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांची संख्या वाढत आहे. मात्र, या रस्त्याच्या कडेला भाजी व इतर वस्तूंचे विक्रेते बसतात, काही हातगाड्याही असतात. नागरिक आपली वाहने रस्त्यावर पार्किंग करून खरेदी करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यातच रस्त्याला पदपथ नसल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो. अशातच बस आल्यानंतर इतर वाहनांना पुढे जाताच येत नाही.

हेही वाचा

Back to top button